₹4 crore fund sanctioned, yet the road remains unchanged; NCP launches protest : ४ कोटींचा निधी मंजूर, तरी रस्ता जसाच्या तसा;देवपूर घाटातील खड्ड्यांवरून प्रशासनाविरोधात जनआक्रोश
Masrul धाड-जामठी-देवपूर फाटा मार्गावरील देवपूर घाट परिसरातील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अजित पवार गटाच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये बेशरमची रोपे लावून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध नोंदविला.
देवपूर घाट परिसरातील हा महत्त्वाचा मार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाला आहे. परिणामी वाहनधारक, शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून १३ एप्रिल २०२६ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता. आमदार श्वेता महाले यांच्या प्रतिनिधींच्या हस्ते कामाचे उद्घाटनही पार पडले; मात्र सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
SIR campaign : काँग्रेसचे वरातीमागून घोडे; एसआयआर मोहिमेच्या प्रशिक्षणासाठी आढावा बैठक
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले. यावेळी मनोज दांडगे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत, “मंजूर निधी असूनही काम रखडणे ही गंभीर बाब आहे. प्रशासनाने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संबंधित रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.या आंदोलनात निलेश देठे, राजू नरोटे, कल्याण ठाकूर, जगन कानडजे, गणेश नरवाडे, सतीश कानडजे आदी नागरिक उपस्थित होते.








