बुलढाणा
Won the election by overcoming dishonesty : आमदार संजय गायकवाड झाले भावनिक
विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराकडून पैशाचा प्रचंड दुरपयोग करण्यात आला. शिवाय सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन माझ्या पराभवासाठी षडयंत्र रचले. तरीही प्रामाणिक व सच्च्या कार्यकर्त्यांच्या जोरावर माझा विजय झाला. बेईमानीवर मात करून मी निवडणूक जिंकलोय, या शब्दांत आमदार संजय गायकवाड यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
Buldhana बुलडाणा तसेच मोताळा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. स्थानिक धाड नाका येथील ओंकार लॉन्स याठिकाणी आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्याला मतदारसंघातील पुरुष व महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
गायकवाड म्हणाले, ‘गेल्या अडीच वर्षात सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन निःपक्षपणे विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अपूर्ण राहिलेली विकासकामे भविष्यात पूर्ण करायची आहेत. त्यामध्ये टेक्सस्टाइल पार्क, फूडपार्क, बेरोजगारीचे प्रश्न, सिंचनाची क्रांती घडवणारा बोदवड सिंचनप्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध बाबींवर काम करायचे आहे.’
जिल्हा परिषद, नगरपालिका, बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये होतकरू कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. त्यामुळे प्रत्येक मोठ्या गावात कार्यकर्त्यांनी शाखेच्या माध्यमातून तेथील जनतेची कामे करावी. दुर्दैवाने माझा पराभव झाला असता, तरीही मी सच्च्या कार्यकर्त्यांसाठी लढत राहिलो असतो, असेही ते म्हणाले.
मला पडलेली 92 हजार मते ही मते फिक्स आहेत. विरोधी पक्षांचे भविष्यात काय हाल होतील हे सांगता येणार नाही. कार्यकर्त्यांनी घमेंडी न राहता जनतेची कामे करावी. जनतेशी आपुलकीने वागून भविष्यातील रणनीती आताच आखून ठेवावी. संघर्षशील कार्यकर्त्यांच्या साथीने पक्षाचे कार्य होणार आहे. यातून विरोधी पक्षाचा भोंगा वाजविल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार गायकवाड म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल रिंढे यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी युवासेनेचे राज्य समन्वयक कुणाल गायकवाड व धर्मवीर फाऊंडेशनचे पृथ्वीराज गायकवाड यांनी परिश्रम घेतले. मेळाव्याला जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.