Strict action will be taken against those selling tobacco products in school premises : अकोला पोलिसांची विशेष मोहीम : ६०७ लोकांवर कारवाई आणि ७७८०० रुपयांचा दंड वसूल
Akola ग्लोबल युथ टोबॅको सर्वे (GYTS-4) 2019 च्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील 5.1% विद्यार्थी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. यामध्ये मुलांमध्ये हे प्रमाण 5.8% असून, मुलींमध्ये 4.4% आहे. तंबाखू सेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि मुखाचा कर्करोग यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. याचाच विचार करून अकोला पोलिसांनी एक मोहीम सुरू केली आहे. शाळेच्या परिसरात आता तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांची आता काही खैर नाही, असाच इशारा पोलिसांनी दिला आहे.
गणतंत्र दिनाच्या निमित्ताने, 26 जानेवारी रोजी तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती वाढवण्यासाठी अकोला पोलिसांनी विशेष मोहिमेचे आयोजन केले. ध्वजारोहण कार्यक्रमात तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली, ज्यामध्ये पोलिसांनी नागरिकांना तंबाखूचे सेवन व विक्री टाळण्याचे आवाहन केले.
तंबाखू नियंत्रण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 हा भारत सरकारचा कायदा आहे. तर 18 सप्टेंबर 2019 च्या ई-सिगारेट बंदी अध्यादेश व 29 मे 2021 च्या महाराष्ट्र शासन निर्णय आहे. त्यानुसार तंबाखू विक्रीस प्रतिबंध लागू करण्यासाठी अकोला जिल्ह्यात पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.
22 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये व आरोग्य संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 607 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर 77,800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
Minister Akash Fundkar : सर्वसमावेशक विकासाच्या प्रक्रियेला गती
अकोला पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबवल्या जातील. शाळा, आरोग्य संस्था आणि शासकीय कार्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सर्व नागरिकांनी तंबाखूमुक्त परिसराच्या निर्मितीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन अकोला पोलिस दलाने केले आहे