व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sunetra Pawar : ‘दादांवर खरंच प्रेम होतं का?’ एका पोस्टने राष्ट्रवादीतील संघर्षाची...

Sunetra Pawar : ‘दादांवर खरंच प्रेम होतं का?’ एका पोस्टने राष्ट्रवादीतील संघर्षाची चर्चा ऐरणीवर !

sunetra-pawar-ncp-internal-conflict-umesh-patil-post-ajit-pawar-family : ‘सुनेत्रा वहिनींना दुःख व्यक्त करायलाही उसंत मिळाली नाही’

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल असे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर उमेश पाटील यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या पोस्टमधील सवाल आणि भावना यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर बदलांच्या चर्चांना उधाण आले आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीनंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदात बदल करण्याबाबत चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. सध्या सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावरूनही पक्षांतर्गत आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. काही नेत्यांकडून प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पक्षाच्या आगामी संघटनात्मक निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांच्यावर प्रेम असल्याचा दावा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पश्चात कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

‘दादांवर खरंच प्रेम होतं, तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरील प्रेम कमी कसं होऊ शकतं?’ असा थेट सवाल उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांनी ज्यांना संधी दिली, ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ज्यांना राजकीय आयुष्यात पुढे जाण्यासाठी आधार दिला, अशा व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबाच्या अडचणीच्या काळात साथ देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आजही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचेही उमेश पाटील यांनी नमूद केले. ‘दादांचा परिवार हाच आपला परिवार’ या भावनेतून अनेक कार्यकर्ते कोणत्याही स्वार्थाशिवाय काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

Sudhir Mungantiwar चंद्रपूर-मुल महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचा धडक पाठपुरावा ठरला निर्णायक; गडकरींकडून दुरुस्तीला तात्काळ मंजुरी

मात्र, अजित पवार यांच्या नावावर, त्यांच्या विश्वासावर आणि त्यांनी दिलेल्या राजकीय संधींवर मोठे झालेले काही लोक त्यांच्या कुटुंबासाठी मानसिक त्रासदायक वातावरण निर्माण करत असतील, तर त्यामागील भूमिका काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेत होते, तोपर्यंतच ते प्रेम होतं?’ असा रोखठोक प्रश्न उमेश पाटील यांनी पोस्टमधून विचारला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ताकारण, नेतृत्व आणि निष्ठेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांच्या परिस्थितीचाही भावनिक उल्लेख केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर अचानक मोठी जबाबदारी आली. एका क्षणात कुटुंबाचे आयुष्य बदलले आणि त्याचवेळी पक्ष तसेच सरकारशी संबंधित जबाबदाऱ्याही समोर उभ्या राहिल्या, असे त्यांनी म्हटले आहे.

विशेषतः सुनेत्रा पवार यांना स्वतःच्या दुःखातून सावरण्यासाठी आवश्यक असलेला वेळही मिळाला नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून सार्वजनिक आणि राजकीय जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ‘खरं प्रेम असेल तर ते व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही; त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठीही ते तितक्याच ताकदीने उभं राहतं,’ असा संदेश उमेश पाटील यांच्या पोस्टमधून देण्यात आला आहे.

NCP Ajit Pawar: सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीने राष्ट्रवादीत खळबळ, प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांची पोस्ट नेमकी कोणाकडे निर्देश करते, पक्षातील कोणत्या नेत्यांना त्यांचा इशारा आहे आणि आगामी काळात संघटनात्मक पातळीवर कोणते बदल होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

error: Content is protected !!