Sharad Pawar’s NCP meeting with PM Modi causes unease within the MVA : पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोदी भेटीमुळे मविआमध्ये अस्वस्थता
Mumbai भाजपने आमचा पक्ष फोडला आणि तो ऐऱ्यागैऱ्याच्या हाती दिला. त्यामुळे आम्ही कधीच भाजपला माफ करणार नाही, अशा तिखट शब्दांत उद्धव ठाकरे सेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्यामुळे महाविकास आघाडीत मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण वर्तुळाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.
पंतप्रधानांची भेट घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, आमचा स्वाभिमान वेगळा आहे. ज्यांनी आमचा पक्ष फोडला, त्यांच्यासोबत भेट घेणे आमच्या तत्त्वात बसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसमावेशक पक्ष असल्याने त्यांची भूमिका वेगळी असू शकते, मात्र आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा असून मोदींची भेट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, शरद पवार डिमिटेशन (मतदारसंघाची फेररचना) विधेयकाला पाठिंबा देतील किंवा एनडीएत सहभागी होतील, असे मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच विमानात प्रवास केल्यामुळे राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, सध्या लोकसभेत व राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ सुरू असून, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहार्टप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन देऊन माफी मागावी, या मागणीसाठी विरोधकांनी गेल्या दोन आठवड्यांपासून संसदेचे कामकाज रोखून धरले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी भाजपच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू असून, सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे. केंद्र सरकारला काही महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी खासदारांचा पाठिंबा हवा आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांसोबत होणारी भेट ही एक प्रकारे मोठी राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे.








