Pending works at Chandrapur Medical College gain momentum following Sudhir Mungantiwar’s persistent efforts : रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य; निधी व प्रलंबित कामांवर कालबद्ध कार्यवाहीचे मुश्रीफ यांचे निर्देश
Mumbai चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध प्रलंबित कामे, पायाभूत सुविधांच्या समस्या, वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता, मनुष्यबळ तसेच विद्यार्थी व रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर, दर्जेदार आणि आवश्यक वैद्यकीय सेवा मिळावी, या संवेदनशील भूमिकेतून आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून दिली.
रुग्णांच्या आरोग्याशी निगडित कोणतीही अडचण प्रलंबित राहू नये आणि चंद्रपूरसह जिल्ह्यातील नागरिकांना उपचारांसाठी इतरत्र जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी आ. मुनगंटीवार यांनी या प्रश्नांचा ठामपणे पाठपुरावा केला. त्यांच्या या भूमिकेची गांभीर्याने दखल घेत महाविद्यालयातील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीची, सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालय, मुंबई येथील मंत्री हसनजी मुश्रीफ यांच्या दालनात आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथील विविध समस्या व प्रलंबित कामांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार, अनिल भंडारी आयुक्त, डॉ.मिलिंद कांबळे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, HSCC चे व्यवस्थापकीय संचालक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आ. मुनगंटीवार यांनी महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील प्रलंबित बांधकामे, दुरुस्ती व विस्ताराची कामे, विद्यार्थी व निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक सुविधा, रुग्णसेवेतील गरजा, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर पायाभूत सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचा विस्तार आणि रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार, रुग्णांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळण्याच्या दृष्टीने मांडलेल्या विविध मुद्द्यांवर मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी सकारात्मक भूमिका घेतली. चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे वैद्यकीय संस्थान असल्याचे नमूद करत, आ. मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महाविद्यालयातील सर्व प्रलंबित कामांची कामनिहाय यादी तयार करून प्रत्येक कामाची सद्यस्थिती, आवश्यक निधी, काम पूर्ण करण्याची अपेक्षित कालमर्यादा आणि जबाबदार अधिकारी यांचा समावेश असलेला कालबद्ध कृती आराखडा शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.HSCC आणि संबंधित बांधकाम कंत्राटदारांनी सुरू असलेल्या कामांमध्ये अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व बांधकामांची गुणवत्ता निर्धारित शासकीय निकष व मानकांनुसार राहील, याची संबंधित विभागाने खात्री करावी. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असेही निर्देश देण्यात आले.
Farmers Agristack : सातबाऱ्यावर नाव नसले तरी शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ
महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय उपकरणांचा आढावा घेऊन त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनास तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांचा आढावा घेऊन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही मंत्री मुश्रीफ यांनी दिले.विद्यार्थी, निवासी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळा, वसतिगृह, स्वच्छता, पाणी, वीज यांसह इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन त्या प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
रुग्णांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णसेवेत कोणत्याही प्रकारचा अडथळा अथवा अनावश्यक विलंब होणार नाही, याची विशेष दक्षता अधिष्ठाता यांनी घ्यावी, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयातील आवश्यक कामांसाठी अतिरिक्त निधीची गरज असल्यास सविस्तर प्रस्ताव, अंदाजपत्रक व आवश्यक कागदपत्रांसह शासनाकडे तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक प्रलंबित बाबीसाठी संबंधित विभाग व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमित आढावा घेण्याचेही निर्देश देण्यात आले.बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन प्रत्येक बाबीचा सविस्तर अनुपालन अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक असून, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रत्येक बाबीवर गांभीर्याने विचार करून तातडीची, सकारात्मक आणि कालबद्ध कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.








