Controversy over the incomplete rendition of Vande Mataram at Nagpur Municipal Corporation; Mayor orders the Commissioner to conduct an inquiry and take action : नागपूर महापालिकेत ‘वंदे मातरम्’च्या अर्धवट गायनावरून वाद; महापौरांचे आयुक्तांना कारवाईचे आदेश
Nagpur देशभरात ‘वंदे मातरम्’च्या कडव्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच, भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महानगरपालिकेतच या राष्ट्रगीताची अवहेलना झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मनपाच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम्ची केवळ दोनच कडवी असलेली अर्धवट ध्वनीफित वाजवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापौर नीता ठाकरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन यांना तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’च्या रचेनेस १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने शासकीय कार्यक्रमांमध्ये या गीताची सर्व सहाही कडवी गाणे बंधनकारक केले आहे. असे असताना २० ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत केवळ दोनच कडवी वाजवण्यात आली. यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत, भाजप आपलेच नियम व आदेश पायदळी तुडवत असल्याची कडक टीका केली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून महापौर नीता ठाकरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान असलेल्या राष्ट्रगीताचा उचित सन्मान राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. महापालिकेच्या सभेत अर्धवट ध्वनीफित वाजणे हा अत्यंत बेजबाबदारपणा आहे. या हलगर्जीपणासाठी जबाबदार असणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कठोर कारवाई का करण्यात येऊ नये, असा जाब विचारण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच यापुढे असा गैरप्रकार टाळण्यासाठी वंदे मातरम् गायनाची एक निश्चित कार्यपद्धती तयार करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.








