Congress alleges that the Standing Committee Chairman tampered with the official proceedings : प्रोसिडिंगमध्ये फेरफार केल्याचा आरोप, आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वात आयुक्तांना घेरले
Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे shivani dani यांच्या कारभाराविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत थेट मनपा प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. बैठकीत प्रत्यक्ष मंजूर झालेल्या विषयांच्या इतिवृत्तात मनमानी पद्धतीने बदल केले जात असल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस शिष्टमंडळाने आज पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे vikas Thakre यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन त्यांना चांगलेच धारेवर धरले.
प्रभाग क्र. १४ मधील बडी मस्जिद ते पंचशील नगर (गिट्टीखदान) या सिमेंट रस्त्याच्या मंजुरीवरून हा संपूर्ण वाद पेटला आहे. प्रशासकीय काळात ‘प्रभाग १४’ नावाने मंजूर झालेल्या या कामात, स्थायी समितीची कोणतीही मंजुरी नसताना अनधिकृतपणे ‘प्रभाग १४ (अ)’ अशी नोंद करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणातील मूळ फाईल सचिवालयातून अनधिकृतपणे बाहेर नेण्यात आली आणि त्यात भाजप नगरसेविकेचे आवक-जावक नोंद नसलेले पत्र जोडण्यात आले, असा धक्कादायक उलगडा करत फाईलमध्ये फेरफार करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.
सोबतच, पश्चिम नागपूरमधील क्रीडांगणाचा विकास आणि निधीची पुनरावृत्ती टाळण्याबाबत त्यांनी आयुक्तांना पूर्वपत्रांची आठवण करून दिली.
कोणत्याही एका पक्षाच्या लोकप्रतिनिधीला राजकीय श्रेय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रियेचा दुरुपयोग केला जात आहे. अत्यावश्यक कामांसाठी नगरसेवकांना स्थायी समिती अध्यक्षांचे पत्र आणण्याची सक्ती कोणत्या नियमात आहे, याचा खुलासा आयुक्तांनी करावा,” असा इशारा आमदार विकास ठाकरे यांनी दिला.
तर दुसरीकडे, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनीही मनपाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची निधीच्या बाबतीत अडवणूक आणि प्रोसिडिंगमध्ये फेरफार करून नियमांची पायमल्ली केली जात असून आयुक्तांनी यात पारदर्शकता आणून तात्काळ कारवाई न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. स्थायी समिती सदस्य अभिजीत झा, वसिम खान, मारिस्टेला उसरे आणि विवेक निकोसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भेटीमुळे मनपा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.








