Breaking

Yavatmal Family Accident : आजी-आजोबाला एकाच चितेवर अग्नी!

A huge crowd of citizens attended the funeral : गर्दीने अनुभवला हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग

Accident सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना वणी तालुक्यातील घोन्सा गावात तिघांच्या अपघाती मृत्यूने दुःखाचे सावट पसरले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात घोन्सा येथील आजी-आजोबा आणि नात असे तिघे ठार झाले. बुधवारी दुपारी या तिघांचेही पार्थिव घोन्सा येथे पोहचले. त्यावेळी मृतांच्या नातलगांचा आक्रोश आणि हुंदक्यांनी सारे गाव गलबलून गेले. घराच्या अंगणात धार्मिक सोपस्कार पार पडला. त्यानंतर गावालगतच्या स्मशानभूमीत आजी आजोबाला एका चितेवर अग्नी देण्यात आला. तर चिमुरड्या नातीला बाजूलाच माती देण्यात आली. यावेळी अंत्यसंस्कारासाठी उसळलेल्या अलोट गर्दीने हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग अनुभवला.

घोन्सा येथील रहिवासी सतीश भाऊराव नागपुरे (51), मनिषा सतीश नागपुरे व त्यांची नात मायरा राहुल नागपुरे (3) हे तिघेजण 31 डिसेंबरला सायंकाळी 4 वाजता भद्रावती येथे दुचाकीने गेले होते. तेथे सतीश नागपुरे यांचा साडभाऊ वास्तव्याला आहे. 1 जानेवारी रोजी भद्रावतीलगतच्या चिरादेवी येथे भरणाऱ्या यात्रेसाठी सतीश नागपुरे हे पत्नी व नातीसह साडभावाकडे गेले होते. भद्रावती येथील पेट्रोलपंपाजवळ साडभावाचा धाबा आहे. 31 डिसेंबर असल्याने सतीश नागपुरे यांना त्यांच्या साडभावाने जेवणासाठी धाब्यावर बोलाविले. त्यामुळे सतीश, त्यांची पत्नी मंजुषा व नात मायरा हे धाब्यावर गेले.

Nagpur Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्यांना आक्षरण बदलाचा बसणार फटका?

जेवण आटोपल्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी या तिघांसह साडभावाची मुलगीदेखील दुचाकीवर बसली. चौघेही घराकडे निघाले. वाटेत एक रस्ता दुभाजक ओलांडत असताना चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सतीश नागपुरे, त्यांची पत्नी मनिषा व नात मायरा हे तिघेही जागीच ठार झाले. तर साडभावाची मुलगी जखमी झाली.

अपघाताची वार्ता मंगळवारी रात्री घोन्सा गावात पोहचली. मृतांच्या नातलगांसह गावकऱ्यांना धक्काच बसला. बुधवारी या तिघांचेही पार्थिव घोन्सा गावात पोहचले. सतीश नागपुरे यांच्या घरासमोर नातेवाईक तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघातात मृत सतीश नागपुरे यांना राहुल आणि साहिल अशी दोन मुले आहेत.

तिघांचेही पार्थिव रुग्णवाहिकेने बुधवारी दुपारी 3 वाजता घरी पोहचले. मृत मायराची आई काजल, वडील राहुल व नातलगांनी प्रचंड आक्रोश केला. आई-वडिलांचा टाहो पाहून गावकऱ्यांनीदेखील आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाल्याचे दिसून आले.