sudhir-mungantiwar-chandrapur-police-30-52-crore-20-55-hectare-land-modern-facilities : अत्याधुनिक सुविधांसाठी २०.५५ हेक्टर जमीन होणार उपलब्ध
Chandrapur : चंद्रपूरच्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून, पोलीस विभागासाठी आरक्षित जमिनीच्या भूसंपादनासाठी तब्बल ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नवीन चंद्रपूर विकास योजनेतील कोसारा आणि दाताळा येथील एकूण २०.५५ हेक्टर जमीन पोलीस विभागाला उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या जागेवर डॉग स्क्वॉड प्रशिक्षण केंद्र, पोलीस प्रशिक्षण केंद्र, पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी मैदान, बीडीडीएस प्रशिक्षण केंद्र, इनडोअर फायरिंग रेंज तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी शासकीय निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. नवीन चंद्रपूर विकास योजनेतील मौजा कोसारा येथील आरक्षण क्रमांक ११० मधील ८.३० हेक्टर आणि मौजा दाताळा येथील आरक्षण क्रमांक १३३ मधील १२.२५ हेक्टर जमीन पोलीस विभागासाठी आरक्षित आहे. या जमिनीच्या भूसंपादनासाठी यापूर्वी ४३ कोटी ६५ लाख ८३ हजार १६ रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी आता ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Farmers Protest : बळीराजा संकटात! सोयाबीन करपले, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
पोलीस दलाच्या प्रशिक्षणापासून निवास व्यवस्थेपर्यंत आवश्यक सुविधा उभारण्यासाठी मुनगंटीवार यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. पोलीस ठाण्यांच्या इमारती, कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था आणि डीजी लोन योजनेच्या प्रश्नांनंतर आता अत्याधुनिक प्रशिक्षण व कार्यसुविधांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या निर्णयामुळे चंद्रपूरच्या पोलीस यंत्रणेच्या क्षमतावाढीसह अधिकारी आणि अंमलदारांच्या सुविधांमध्येही मोठी भर पडणार असून, प्रशिक्षण आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.








