नागपूर
Nagpur
Farmers will benefit from the very first decision of Bawankule’s ministry : आकारी पड जमिनी त्याच शेतकऱ्यांच्या नावे होणार
महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्यातील 963 शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळाला आहे. शेतसारा अथवा महसुली देणी देऊ न शकल्याने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने जप्त केल्या होत्या, त्या परत त्याच शेतकऱ्यांच्या नावे होणार आहेत.
अशा जमिनींना सरकारी भाषेत आकारी पड जमिनी असे म्हणतात. या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याची जुनी मागणी होती. मात्र त्यावर निर्णय होत नव्हता. राज्यातील 963 शेतकऱ्यांच्या चार हजार 949 हेक्टर आर जमिनी शासन जमा झाल्या होत्या. जप्त असलेल्या या जमिनी वर्ग दोनच्या असून त्यांचा ताबा जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. या जमिनींच्या संदर्भात देय आकाराच्या रकमा व त्यावरील व्याज यांच्या वसुलीसाठी 12 वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर जमिनींचा लिलाव करण्यात येतो.
लिलावाच्या रकमेतून शासनाचे येणे वसूल केले जाते. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना परत केली जाते. ही उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी शासनाला द्यायच्या रकमेपेक्षा खूप जास्त असते. शासनाला मिळणाऱ्या अल्परकमेसाठी शेतकऱ्यांची जमीन वर्षानुवर्षे शासनाकडे पडून राहण्यापेक्षा रेडीरेकनर दराच्या 25 टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना परत मिळावी यासाठी हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. या जमिनी वर्ग एकमध्ये आणून ज्या शेतकऱ्यांच्या होत्या त्यांच्याच नावे करता येतील. यासाठी राज्य सरकार कायद्यात सुधारणा करणार आहे.
‘माझी सुरूवातच माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याने झाली. याचा मला आनंद आहे. दुष्काळ अथवा अनेक अडचणींनी ज्या शेतकऱ्यांनी सरकारला महसूल दिला नाही, त्यामुळे या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या होत्या. किमान पन्नास वर्षांपासून याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. आज शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखालील Mahayuti सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.