व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘ठाकरे बंधु’ पुन्हा एकत्र, ४ ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांविरोधात आक्रमक मोर्चा

‘ठाकरे बंधु’ पुन्हा एकत्र, ४ ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांविरोधात आक्रमक मोर्चा

काँग्रेसला एकत्र येण्याचे आवाहन, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मागणार

Mumbai हिंदी सक्तीच्या मुद्यावर केंद्र आणि महायुती सरकारला बॅकफूटवर ढकलल्यानंतर, आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केंद्र सरकारच्या विरोधात थेट मैदानात उतरले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा आणि एसआयआरच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी संयुक्त आंदोलनाची हाक दिली असून, येत्या ४ ऑक्टोबरला मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीसह सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे उघड आवाहन दोन्ही नेत्यांनी केले आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणाऱ्या राज ठाकरेंची भूमिका आणि काँग्रेससोबत गेलेले उद्धव ठाकरे यांची राजकीय दिशा वेगवेगळी राहिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि लोकशाहीच्या ढाच्यावर गदा येत असल्याचे सांगत दोन्ही बंधू पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात एकाच व्यासपीठावर आले आहेत. यापूर्वी हिंदी सक्तीविरोधातील संयुक्त आंदोलनामुळे सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता.

भाजप नगरसेवकांसाठी निधीचा कट ऑफ ‘१०० मतदार’; पदवीधरसाठी फॉर्म्युला हिट

त्यावेळी आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच, या राज ठाकरेंच्या विधानानंतर दोन्ही पक्ष विलीन होणार का, अशा चर्चा रंगल्या असल्या तरी, सध्या तरी दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत मुद्द्यांवर आधारित एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

‘मत चोरी’च्या आरोपावरून काँग्रेसचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

राज ठाकरे यांनी ईव्हीएम ऐवजी पुन्हा बॅलेट पेपर’वर निवडणुका घेण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्याआधीच काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभर आक्रमक आंदोलने करत या मुद्द्यावर पहिली आघाडी घेतली आहे. सोमवारी काँग्रेसने विविध शहरांत निदर्शने करून केंद्र सरकारवर दबाव वाढवला आहे. अशा परिस्थितीत, ४ ऑक्टोबरच्या ठाकरे बंधूंच्या या धडक मोर्चात काँग्रेस प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सहभाग नोंदवते की केवळ नैतिक पाठिंबा देऊन मोकळी होते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!