व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण पदवीधरमध्ये यंदा ‘नो रिस्क’! भाजपला पुसायचाय पराभवाचा डाग

पदवीधरमध्ये यंदा ‘नो रिस्क’! भाजपला पुसायचाय पराभवाचा डाग

माजी आमदाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील पराभवाचा डाग पुसण्यासाठी भाजपने आता सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा प्रयोग मागच्या वेळी भलताच अंगाशी आल्याने, यावेळी कोणताही धोका न पत्करता नोंदणी प्रमुख आणि माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्याच उमेदवारीवर भाजप शिक्कामोर्तब करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

मागच्या निवडणुकीत ऐनवेळी तत्कालीन आमदार अनिल सोले यांचे तिकीट कापून माजी महापौर संदीप जोशी यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपला चांगलाच महागात पडला होता. या अदलाबदलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली अस्वस्थता थेट पराभवात बदलली. कै. गंगाधरराव फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा पारंपरिक गड काँग्रेसने जिंकल्याने भाजपच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला होता. मागच्या चुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्षाने आधीपासूनच रणनीती आखली आहे. सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तब्बल पावणेदोन लाख पदवीधर मतदारांची नोंदणी पूर्ण केली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघात उमेदवारीवरून चुरस; काँग्रेसकडून अदिती पोहरे मैदानात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष यांनीही कोहळे यांच्याच नावाला कौल दिला आहे. त्यामुळे आता कोहळेंचा पत्ता कापून दुसरं नाव समोर आणणे भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही यावर सर्वांचे एकमत झाले आहे.
दुसरीकडे, माजी आमदार अनिल सोले यांनी पुन्हा एकदा लढण्याची तयारी दर्शवल्याने भाजप त्यांची मनधरणी कशी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, राजकीय आणि जातीय समीकरणांचा विचार करता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे कोहळेंच्याच नावासाठी आग्रही आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच अर्ज भरण्याचा प्लॅन असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत भाजप आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. गमावलेला गड परत मिळवण्यासाठी भाजपने ‘नो रिस्क’ फॉर्म्युला लागू केला असून, आता केवळ औपचारिक घोषणेचीच प्रतीक्षा शिल्लक असल्यचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!