निवडणूक आयुक्त सरकारच्या तालावर नाचत असल्याची टीका
Nagpur मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना हटवण्याच्या मागणीवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट लक्ष्य केले आहे. केवळ ज्ञानेशकुमारांना हटवून चालणार नाही, तर या सर्व प्रकारामागे असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पदावरून हटवण्याची गरज आहे, असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला.
ज्ञानेशकुमार हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप करत पटोले म्हणाले की, इतर दोन निवडणूक आयुक्तांचा विरोध असतानाही ज्ञानेशकुमार यांनी मतदारांची नावे वगळण्याचा निर्णय घेतला. भाजपला फायदा कसा होईल, याच हेतूने आयोग निर्णय घेत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात मतचोरी झाली असून, यामुळेच महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे निकाल अत्यंत संशयास्पद वाटतात.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभेपूर्वी अचानक मतदार संख्येत झालेली अवाढव्य वाढ हा मोठा घोटाळा होता, असा पुनरुच्चार पटोले यांनी केला. आता एसआयआर प्रक्रियेत नावे वगळली जात आहेत, याचाच अर्थ आधी मतदार याद्यांमध्ये अनधिकृत नावे घुसडण्यात आली होती हे सिद्ध होते. या सगळ्यामागे फक्त निवडणूक आयुक्त दोषी नसून, त्यांना तसे करायला लावणारे भाजपचे नेतृत्वही तितकेच जबाबदार आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.








