आंदोलनांचे सत्र, घटक पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग
Washim : मतचोरी, दुष्काळ आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवरून दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलनांचे वातावरण निर्माण झाले असताना, वाशिम जिल्ह्यात काँग्रेस आणि विकास आघाडीतील घटक पक्षांच्या राजकीय हालचालींनाही वेग आल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकांतील अनपेक्षित पराभवांनंतर काहीसे शांत असलेले विरोधी पक्ष आता आंदोलनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत आहेत. या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण होत असून, दुरावलेले नेतेही एकाच व्यासपीठावर किंवा संपर्क मोहिमांच्या माध्यमातून एकत्र येताना दिसत आहेत. मात्र, या नव्या हालचालींचे रूपांतर प्रत्यक्ष निवडणुकीतील यशात होणार का, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
वाशिम जिल्ह्यात काँग्रेसच्या गोटात अलीकडच्या काळात काही प्रमाणात चैतन्य दिसू लागले आहे. कधी विविध प्रश्नांवर आंदोलन, तर कधी पक्ष सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांची घरवापसी, अशा माध्यमांतून संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाध्यक्ष राजू चौधरी आणि माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव सरनाईक यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर जुन्या जाणत्या नेत्यांशी संपर्क साधण्याची मोहीमही सुरू झाली आहे.
भोयर, शिंदे-बोंडे यांच्यासह तिघांचे भाजपमधून निलंबन; आमदार-खासदारही रडारवर!
नुकतीच या नेत्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल वासनिक यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. या भेटीमुळे पक्षातील नेत्यांमधील संवाद वाढवण्याचा आणि संघटनात्मक पातळीवर नवचैतन्य निर्माण झाल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, मतचोरीचा मुद्दा, दुष्काळाचे संकट आणि इतर सार्वजनिक प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनांमुळे विरोधकांना सरकारविरोधात भूमिका मांडण्यासाठी संधी मिळाली आहे. आंदोलनांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे काही काळ राजकीयदृष्ट्या निष्क्रिय भासणाऱ्या पक्षांमध्ये हालचाली वाढल्याचे चित्र आहे.
मात्र, नेत्यांच्या भेटीगाठी, हारतुरे, आंदोलनांतील सहभाग आणि पक्षात परतणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या एवढ्यावर संघटनात्मक यशाचे गणित सुटणार नाही. गटबाजी, परस्पर मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाचा अभाव यांसारख्या प्रश्नांवर तोडगा काढणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. नेते एकत्र दिसत असले, तरी ही एकजूट कितपत टिकते आणि तिचा तळागाळातील संघटनावर किती परिणाम होतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत. सध्याच्या राजकीय हालचालींचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी बूथस्तरावरील बांधणी, स्थानिक प्रश्नांवर सातत्यपूर्ण काम आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय आवश्यक असेल.
एकूणच, काँग्रेसच्या गोटातील वाढती हालचाल आणि विरोधकांमधील नव्या एकत्रीकरणाचे प्रयत्न लक्षवेधी आहेत. मात्र, राजकीय उत्साहाचे मोजमाप केवळ सभा, भेटीगाठी आणि आंदोलनांवरून करता येणार नाही. या हालचालींची खरी कसोटी निवडणुकीच्या मैदानात लागणार आहे. सध्याची धावपळ संघटनात्मक बळकटीकडे नेणार की निवडणुकीनंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होणार, याचे उत्तर आगामी काळातील राजकीय घडामोडी आणि मतदारांचा कौलच देईल.
_____
washim-congress-leaders-unity-active-workers-election-challenge








