व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण देवीच्या दरबारात कृष्णाभाऊंचे साकडे!

देवीच्या दरबारात कृष्णाभाऊंचे साकडे!

नेमके काय आहे राजकीय गणित?

Gadchiroli : संस्कृती, परंपरा आणि भक्तिभावाचा अनोखा संगम म्हणून आरमोरी येथील नवरात्रोत्सवाला संपूर्ण विदर्भात विशेष महत्त्व आहे. यंदाही घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. याच भक्तिमय वातावरणात माजी आमदार कृष्णा गजबे यांनी ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार यांच्यासमवेत देवीच्या दरबारात हजेरी लावली. मात्र, या दर्शनामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, कृष्णाभाऊंनी देवीकडे नेमके कोणते साकडे घातले, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवाची सल कृष्णा गजबे यांच्या मनात अद्याप कायम असल्याची चर्चा आहे. दोन वेळा आमदार म्हणून काम केलेल्या गजबे यांच्यासाठी हा पराभव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. मात्र, त्यानंतरही राजकीय मैदानात सक्रिय राहण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले. आरमोरी आणि देसाईगंज या दोन्ही महत्त्वाच्या नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकवण्यात पक्षाला यश मिळाल्याने स्थानिक राजकारणात पक्षाची उपस्थिती कायम असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्थानिक पातळीवर राजकीय बळ टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

भोयर, शिंदे-बोंडे यांच्यासह तिघांचे भाजपमधून निलंबन; आमदार-खासदारही रडारवर!

राजकारणात केवळ निवडणुकीच्या काळात जनतेसमोर येऊन चालत नाही, तर वर्षभर लोकांमध्ये राहणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांत उपस्थिती लावणेही महत्त्वाचे मानले जाते. सार्वजनिक उत्सव हे जनसंपर्काचे एक महत्त्वाचे माध्यम ठरतात. कृष्णा गजबे यांना दोन वेळच्या आमदारकीच्या अनुभवातून या बाबींचे महत्त्व चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवातील त्यांची उपस्थिती ही केवळ धार्मिक श्रद्धेचा भाग आहे की त्यामागे राजकीय समीकरणांचाही विचार आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा संभाव्य राजकीय संदर्भ वगळता त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला दिशा देणारी दुसरी कोणती निवडणूक तातडीने समोर नसल्याने या भेटीचे गूढ अधिकच वाढले आहे. आगामी काळात कोणती राजकीय संधी उपलब्ध होणार, पक्षसंघटनेत कोणती भूमिका मिळणार आणि मतदारांशी संपर्क कसा कायम ठेवायचा, असे प्रश्न त्यांच्या समर्थकांसमोर असू शकतात.
अर्थात, देवीच्या दर्शनामागे नेमका कोणता राजकीय हेतू होता, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या उपस्थितीचा अर्थ राजकीय संकेत म्हणून लावणे घाईचे ठरेल. तरीही आरमोरीच्या नवरात्रोत्सवातील कृष्णाभाऊंच्या हजेरीने चर्चेला नवा विषय दिला आहे. श्रद्धेच्या दरबारात माथा टेकवताना त्यांनी मनोमन कोणते साकडे घातले, याचे उत्तर सध्या गुलदस्त्यातच आहे.

_____

 

error: Content is protected !!