अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचे नियोजन; शिक्षकांशी थेट संवाद साधण्यावर भर
Akola अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधून महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी पक्षाने नियोजन केले आहे. संबंध आणि जवळीक यांचा विचार न करता राजकीय विचारधारा आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.
भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने किमान पाच शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची मते महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या माध्यमातून शिक्षक मतदारांशी संपर्क वाढविण्यावर पक्षाने भर दिला आहे.
भाजप कार्यालयात निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा
यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री प्रवीण पोटे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, शहराध्यक्ष जयंत मसने, महापौर शारदाताई खेडकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विजय अग्रवाल, हर्षद साबळे, माधव मानकर, सुलभाताई दुतोंडे, मायाताई घुले, वैशालीताई पालीवाल, अंबादास उमाळे, उमेश पवार, गणेश अंधारे, चंद्रकांत अंधारे, रमण जैन, मनीष गावंडे, डॉ. अमित कावरे, राजेश नागमोते, पवन महल्ले, प्रा. राजेश बेले, दीपक गवई, प्रा. अनिल गासे, ॲड. रूपाली काकड, ॲड. देवाशिष काकड, विद्याधर काकड, प्रा. देशमुख, प्रा. गावंडे, प्रा. अनुप शर्मा, वसंत बाचुका, नाना कुलकर्णी, पोटे, विजयसिंह गहलोत, भिसने, जोशी गुरुजी, पाटील गुरुजी आणि रामदास लांडे आदी उपस्थित होते.
भाजप-शिवसेनेचा संयुक्त शिक्षक संवाद
महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी भाजपच्या वतीने लवकरच शिवसेनेच्या नेत्यांसोबत संयुक्त शिक्षक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार राजन साळवी यांनी भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. अकोला, बुलढाणा, वाशिम आणि अमरावती या चार जिल्ह्यांतून सरनाईक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसकडून भाजपविरोधात द्वेषाचे राजकारण केले जात असून, भाजप नेत्यांवर खालच्या स्तरावर टीका केली जात असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय झाला असल्याचे भाजप नेते माधव मानकर यांनी सांगितले.








