‘परफॉर्मन्स’चा दाखला देत महायुतीच्या नेत्यांना लगावला टोला
Bhandara भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे हे सध्याच्या मंत्र्यांचा परफॉर्मन्स पाहून मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत, असा दावा करत भोंडेकर यांनी थेट मंत्रिपदावर दावा ठोकला आहे.
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भोंडेकर नाराज होते. आता परफॉर्मन्सच्या बहाण्याने त्यांनी पुन्हा एकदा आपली सुप्त इच्छा मीडियाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मूळचे शिवसैनिक असलेले भोंडेकर हे अपक्ष म्हणूनही निवडून आलेले नेते आहेत. महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पुन्हा शिंदे गटात प्रवेश केला. मागील निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांकडून तीव्र विरोध असतानाही त्यांनी विजय खेचून आणला. विशेष म्हणजे, प्रचारकाळात एकनाथ शिंदे वगळता महायुतीच्या एकाही मोठ्या नेत्याने त्यांच्यासाठी सभा घेतली नव्हती.
शेतकरी संकटात तर मुनगंटीवार सर्वांत पहिले मैदानात; समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा
आपल्या फटकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भोंडेकर याच मुद्द्यावरून नेहमी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर निशाणा साधत असतात. इतकेच नव्हे, तर दूध संघाच्या निवडणुकीत त्यांनी थेट काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याशी हातमिळवणी करून महायुतीतील नेत्यांना धक्का दिला होता.
पूर्व विदर्भात शिवसेनेची मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या भोंडेकर यांची नाराजी दूर करण्यासाठी यापूर्वी शिंदेंकडून त्यांची समजूत काढण्यात आली होती. मात्र, आता एकनाथ शिंदे हे पश्चिम विदर्भ दौऱ्यावर असतानाच भोंडेकर यांनी हे ‘परफॉर्मन्स’चे वक्तव्य करून योग्य राजकीय टायमिंग साधले आहे. मीडियाच्या माध्यमातून ते आपली मंत्रिपदाची मागणी थेट शिंदेंच्या दरबारी पोहोचवत असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर नागपूरमध्ये अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला जाहीर केला होता. सर्वांना संधी दिली जाईल, असे सांगत त्यांनी छगन भुजबळ आणि गडचिरोलीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना मंत्रिमंडळातून वगळून सबुरीचा सल्ला दिला होता.
काँग्रेसला काहीच जमत नसल्याने नैराश्य; पोकळ टीका करण्यात नेते व्यस्त
पुढील काळात धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनंतर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री झाली, मात्र आत्राम अजूनही वेटिंगवरच राहिले. आता अजितदादांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावर काय निर्णय घेतात आणि एकनाथ शिंदे भोंडेकर यांच्या दाव्याची दखल घेतात का, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.








