519 crores approved for District Annual Plan : पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
Buldhana जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एकूण ५१९.४३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या योजनेत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी ४००.७८ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत १०० कोटी रुपये, तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी १८.६५ कोटी रुपये असा निधी मंजूर करण्यात आला आहे.
निवडणुकीनंतर जिल्हा नियोजन समितीची ही पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीला केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती होती.
जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीसाठी ९३६.२४ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच, राज्यस्तरीय समितीकडे ५३५.४६ कोटी रुपयांच्या वाढीव निधीसाठी मागणी करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत १६४.०२ कोटी रुपये तर आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ३३.९० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
त्यासाठी अनुक्रमे ६४.०२ कोटी व १५.२५ कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी राज्यस्तरावर केली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी (२०२४-२५) मंजूर करण्यात आलेल्या ४४० कोटी रुपयांच्या आराखड्यातील ३९४ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत. राज्य शासनाकडून १७६ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी १५१ कोटी (८५.८३%) रुपये वितरित करण्यात आले आहेत.
उर्वरित निधी लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. पालकमंत्री पाटील यांनी मंजूर आराखड्यातील सर्व कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत जिल्ह्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा व रस्ते क्षेत्रांतील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शासकीय रुग्णालयांची सुधारणा, जिल्हा परिषद शाळांमधील स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय अधिकारी भरती, ट्रॉमा केअर सेंटर, मॉडेल शाळा, मागेल त्याला सौर कृषी पंप, व्यायामशाळा आणि पीक विमा यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली.