53 electric buses will be introduced in Wardha : एसटी महामंडळाच्या वर्धा विभागाला खास भेट
Wardha राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाच्या वर्धा विभागात पहिल्या टप्प्यात तब्बल ५३ इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. दोन ठिकाणी चार्जिंग स्टेशनही उभारण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहन वापराची संख्या वाढत आहे. अर्थात पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता राज्य परिवहन महमंडळानेदेखील निर्णय घेत ताफ्यात इलेक्ट्रिक बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी या इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावत असून, आता वर्ध्याच्या रस्त्यावरही लवकरच इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत.
बस ताफ्यातील डिझेलवर धावणाऱ्या बसेसची संख्या कमी करून पर्यावरणपूरक अशा विद्युत बस चालविण्याचे धोरण विभागाने स्वीकारले आहे. त्यानुसार एका कंपनीकडून बसेसचा पुरवठादेखील केला जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाच्या सर्व आगारांमध्ये या बसेस दिल्या जाणार असून, फेब्रुवारीअखेरपर्यंत ताफ्यात या इलेक्ट्रिक बसेस वर्धा विभागात दाखल होणार असल्याची माहिती आहे.
Nagpur Congress : काँग्रेस पदाधिकाऱ्याची फसवणूक; आरोपीही काँग्रेसचेच
वर्धा विभागांतर्गत वर्धा, हिंगणघाट, पुलगाव आर्वी, तळेगाव या पाच आगारात तब्बल २१५ डिझेलवर धावणाऱ्या बसगाड्या आहेत. अनेक बसेस नादुरुस्त आणि कालबाह्य झाल्या आहेत. परिणामी, रस्त्यावर प्रवासी जास्त आणि बसेस कमी अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
वर्धा विभागांतर्गत आगारांमध्ये लवकरच ईव्ही बसेस दाखल होणार आहे. या बसेस नऊ मीटर आणि १२ मीटर लेंथच्या असणार आहे. जिल्ह्यातील एसटीच्या प्रवाशांना निमआराम असलेल्या हिरकणी बसेसच्या भाडेदरात इलेक्ट्रिक बसचा गारेगाव प्रवास अनुभवता येणार आहे. बसेसवर कंत्राटदारांचे चालक असणार असून, एसटी महामंडळ प्रती किलोमीटर ४८ रुपयांप्रमाणे कंत्राटदाराला पैसे अदा करणार असल्याचीही माहिती आहे.
Wardha Crime : महागड्या दुचाकी चोरायचे; चोरट्यांना नागपुरात अटक
आर्वी आगाराच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यांत २२, तर वर्धा आगाराच्या ताफ्यात ३१ बसेस दाखल होणार आहे. दरम्यान, या बसेसची चार्जिंग करण्यासाठी आर्वी आणि सेवाग्राम येथे प्रत्येकी एक एकरवर चार्जिंग स्टेशनची उभारणीदेखील करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
या बसेस बॅटरी विजेच्या ग्रिडमधून चार्ज केल्या जातात. बॅटरीमध्ये साठवलेली वीज इलेक्ट्रिक इंजिनला पुरविली जाते. इलेक्ट्रिक इंजिनमध्ये अंतर्गत ज्वलन इंजिनपेक्षा कमी भाग असल्याने त्याला कमी देखभालीची आवश्यकता असते. वर्धा विभागात लवकरच इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहे. पहिल्या टप्प्यांत आर्वी आगाराला २२ आणि वर्धा आगाराला ३१ बसेस मिळणार आहे.