Calcium syrup is exposed to mold : कॅल्शियम सिरपला बुरशी लागल्याचे उघड
Medicine : सरकारी पुरवठादार औषध कंपन्यांकडून गुणवत्ता नसलेली औषधी पुरविण्यात येत आहेत. ही धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. नागपूर, बीड जिल्ह्यात असा प्रकार सर्रास घडतो आहे. रुग्णांना ही औषधी देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविण्यात आलेल्या कॅल्शियम सिरपला बुरशी लागल्याचे उघड झाले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून औषधी वितरण केले जाते. शासनाने निश्चित केलेल्या पुरवठादार कंपन्या ही औषधी देतात. अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक पातळीवर खरेदीचा निर्णय होतो. पुरवठादार कंपनीने दिलेली औषधी तालुका आरोग्य अधिकारी व तेथून प्राथमिक आरोग्य केंद्रावर देण्यात येते. महिला व मुलांमध्ये तसेच वृद्धांमध्ये कॅल्शियमची कमतरता आढळून येते. यासाठी त्यांना गोळी व सिरपच्या माध्यमातून कॅल्शियम देण्यात येतात.
प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्लायसीकॅल-बी 12 हे सिरप पाठविण्यात आले. ग्लासीअर फार्मास्युटिकल्स प्रा.लि. अमरावती या कंपनीकडून हे सिरप पुरविण्यात आले. या सीलबंद औषधाला बुरशी लागल्याचे निदर्शनास आले. 6 जून 2024 मध्ये हे औषध तयार झाले असून याची एक्सपायरी मे 2026 पर्यंत आहे. 329 सीलबंद बॉटल्स बुरशी लागलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
खैरगाव, सावरगाव (ता. कळंब), अकोला बाजार (ता. यवतमाळ), घारफळ (ता. बाभूळगाव) या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर हा प्रकार निदर्शनास आला आहे. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिली. याबाबत अजून चौकशी झाली नाही. या बॅचचे सिरप इतर कुठल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर, उपकेंद्रावर पोहोचले आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे झाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांवर बुरशी आढळून आलेल्या कॅल्शियम सिरपचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यात या औषधांचा पुरवठा झाला होता. अन्न व औषधी प्रशासन विभागाने या सिरपचे नमुने घेतले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाई होईल.