Amravati केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ चा तीव्र निषेध नोंदवत किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्थसंकल्पाची होळी केली. किसानविरोधी आणि जनविरोधी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला.
किसान सभेच्या वतीने देशभरातील शेतकऱ्यांना ५ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पाच्या प्रती जाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअंतर्गत अमरावती येथे निदर्शने करण्यात आली. या वेळी किसान सभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
Sudhir Mungantiwar : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक कार्याची पुन्हा होतेय आठवण !
केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी निराशाजनक असल्याचा आरोप करण्यात आला. किमान आधारभूत किंमतीला (एमएसपी) कायदेशीर हमी, शेतकरी कर्जमाफी, आणि स्वतंत्र किसान अर्थसंकल्प या महत्त्वाच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे किसान सभेचे म्हणणे आहे. तसेच, कृषी क्षेत्रासाठीचे बजेट ५ हजार कोटी रुपयांनी कमी करण्यात आले असून, हे एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ ३ टक्के आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेसाठीच्या निधीत ३६१२ कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे, तर खताच्या सबसिडीमध्ये २१३ कोटी रुपयांची घट झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत दरवर्षी १० हजार रुपये मिळतील अशी अपेक्षा असताना ती रक्कम पूर्ववत ६ हजार रुपयांवरच ठेवण्यात आली आहे.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा सीसीटीव्हीवरून कठोर पवित्रा !
शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण यांसारख्या क्षेत्रांमध्येही निधी कमी करण्यात आल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, हा अर्थसंकल्प केवळ कॉर्पोरेट हितसंबंध जपणारा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात किसान सभेचे पदाधिकारी अशोक सोनारकर, डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, उमेश बनसोड, सुनील घटाळे, प्रा. विजय रोडगे, अशोक राऊत आणि अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.