Murdered for slapping in front of girlfriend : डाखोळे दाम्पत्य हत्याकांडाने हादरले नागपूर
नागपूर
Nagpur कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुहेरी हत्याकांडात आणखी एक ‘ट्विस्ट’ आला आहे. आरोपी मुलगा उत्कर्ष लीलाधर डाखोळे याचे एका वर्गमैत्रिणीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांना प्रेमविवाह करायचा होता. उत्कर्षने प्रेयसीला घरी बोलावले. आई-वडिलांशी भेट घालून दिली. मात्र, त्यावेळी आईने चक्क नकार दिला होता. तर वडिलांनी उत्कर्षला त्याच्या प्रेयसीसमोरच कानाखाली मारली होती. त्यामुळे, उत्कर्षला वडिलांबाबत मनात खदखद होती.
आईवडिलांचा खून करण्यामागे हेसुद्धा कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपी उत्कर्षला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष डाखोळे हा स्वच्छंदी मुलगा होता. त्याला दारु आणि ड्रग्सचे व्यसन होते. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेण्याऐवजी तो मित्रांसोबत पार्ट्या करायला जात होता. कॉलेजच्या शुल्काच्या नावावर तो आईकडून नेहमी पैसे उकळत होता. लीलाधर डाखोळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन पदावर नोकरीवर होते. तर पत्नी अरुणा डाखोळे या संगीता विद्यालयात शिक्षिका होत्या.
त्यांना मुलगा उत्कर्ष (24) आणि मुलगी सेजल (21) अशी दोन मुले आहेत. मुलगी सेजल ही बीएएमएस पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. उत्कर्षचे त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महाविद्यालयातील मैत्रिणीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचे प्रेमसंबंध तरुणी आणि उत्कर्षच्या घरापर्यंत पोहचले होते. त्यामुळे त्या तरुणीला तिचे आईवडिल लग्नासाठी घाई करीत होते. प्रेयसीनेही उत्कर्षला प्रेमविवाह करण्याचा तगादा लावला होता.
Supply of fungal medicine to health centers : आरोग्य केंद्रांना बुरशीयुक्त औषधीचा पुरवठा !
त्यामुळे उत्कर्षने प्रेयसीची आई-वडिलांशी भेट घालून देण्याचे ठरविले. आई व वडिल घरी असताना त्याने प्रेयसीला घरी बोलावले. आईवडिलांशी ओळख करुन दिली. प्रेमसंबंध असून लग्न करण्याबाबत चर्चा केली. आईने त्याला प्रेमविवाह करण्यास थेट नकार दिला. तर वडिलांनीही आरडाओरड केली. तसेच प्रेयसीसमोरच त्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे उत्कर्षला अपमानित झाल्यासारखे वाटले. तेव्हापासून त्याच्या मनात आईवडिलांबाबत राग खदखदत होता. मात्र, याच कारणातून त्याने आईचा गळा आवळून तर वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हत्याकांडात साथीदार असण्याची शक्यता
आई-वडिल बंगळुरुला ध्यानसाधनेसाठी गेल्याचे सांगून उत्कर्ष बहिणीला (सेजल) बोखारा येथे राहणाऱ्या काकांकडे घेऊन गेला. त्यामुळे सेजलने त्याला विचारणा केली. उत्कर्षने वडिलांच्या भ्रमणध्वनीवरुन सेजलला संदेश पाठवला. त्यात ‘आम्ही पाच जानेवारीला परत येणार आहोत’ असा मजकूर होता. आई-वडिलांचा खून एकट्या उत्कर्षने केला असावा, यावर विश्वासही ठेवता येणार नाही. त्याला कुणीतरी साथ दिली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
‘आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करीत आहोत. शवविच्छेदन करू नका. आमच्या मुलांना त्रास देऊ नका. मृतदेह थेट अंत्यसंस्कारासाठी घेऊन जा,’ अशा प्रकारचा उल्लेख असलेला संदेश वडिलांच्या मोबाईलमध्ये उत्कर्षनेच टाईप करुन ठेवला होता. अशाप्रकारे आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना दुहेरी हत्याकांडाऐवजी आत्महत्येचे प्रकरण वाटले होते.