5 million looted in rich America : नागपुरात पोहोचलेल्या हरप्रितसिंगने सांगितली आपबीती
Nagpur : अमेरिकेत जाऊन नोकरी करायची आणि खोऱ्याने पैसे कमवायचे, असे अनेकांचे स्वप्न असते. कारण डॉलरने पगार देणाऱ्या अमेरिकेत श्रीमंतीचा पूर वाहतो, असे बोलले जाते. मात्र नागपूरच्या एका तरुणाचे अपहरण करून अमेरिकेत त्याचे ५० लाख रुपये लुटण्यात आले. एवढेच नव्हे तर १६ तास पायी चालवून त्याच्यासह तिघांना अमेरिकेच्या बॉर्डरवर नेऊन सोडून दिले. या तरुणाने नागपुरात आल्यावर घडलेली आपबीती सांगितली. त्याची ही कहाणी शाहरुख खानच्या ‘डंकी’ सिनेमाप्रमाणे वाटावी अशीच आहे.
कॅनडामध्ये वाहनचालकाची नोकरी करण्यासाठी हा तरुण अवैध मार्गाने गेला होता. या युवकाचे मॅक्सिकोतून माफियांनी अपहरण केले. माफियांनी त्या युवकाचा पैशांसाठी अतोनात छळ केला. त्याच्याकडून ५० लाख रुपये उकळले. सलग तीन दिवस पायी चालविल्यानंतर अमेरिका सीमेवर सोडून दिले. अमेरिकेने बेकायदेशिर स्थलांतरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर भारतात सोडले. हा तरुण गुरुवारी (6 फेब्रुवारी) सकाळी नागपुरात पोहोचला.
हरप्रीत सिंग लालिया (३३, बाबा बुद्धाजीनगर, पाचपावली) असे त्या युवकाचे नाव आहे. अमेरिकेतून १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात आणले गेले. ४५ अमेरिकन पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत त्यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील तीन युवकांचा समावेश होता.
हरप्रीतसिंग लालिया (३३, नागपूर), मुंबई येथील गुरविंदर सिंग (४४) आणि नाशिक-आडगाव येथील प्रशांत अनिल जहागीरदार (३२) या तिघांचा समावेश होता. मुंबईतून हरप्रीतसिंग याला गुरुवारी सकाळी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. त्याला पाचपावली पोलिसांनी कुटुंबियांच्या ताब्यात दिले. त्यानंतर ठाणेदार बाबुराव राऊत यांनी त्याला चौकशीसाठी पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावले.
कॅनडात वाहन चालकाला चार लाख रुपये वेतन मिळते. त्यामुळे हरप्रीतसिंगला तेथे नोकरी करायची होती. त्यामुळे त्याने एक ट्रक विकला आणि आलेल्या पैशातून कॅनडाला जाण्याची तयारी केली. व्हिसा आणि पासपोर्ट काढले. ५ डिसेंबर २०२४ ला दिल्लीवरुन तो सौदी अरेबीयाला पोहचला. तेथील अधिकाऱ्यांनी त्याला नोकरीसाठी परवानगी नसल्याचे सांगून दिल्लीला परत पाठवले.
हिरमोड झाल्यानंतर पंजाबमधील गुरुदासपूर येथे नातेवाईकाच्या माध्यमातून त्याची एका दलालाशी भेट झाली. त्याने १८ लाख रुपये दिल्यास थेट कॅनडात नेण्याची हमी दिली. त्यामुळे हरप्रीतने त्याला १८ लाख रुपये दिले.
दलालाने पैसे घेऊन त्याला अन्य दलालाच्या माध्यमातून कायरो-इजिप्तला पाठवले. तेथे अन्य १५० जण दलालासोबत होते. त्यांनाही कॅनडाला जायचे होते. तेथे चार दिवस थांबवल्यानंतर माँट्रियल येथे नेण्यात आले. तेथून लगेच स्पेनमध्ये नेण्यात आले. चार दिवस पुन्हा थांबल्यानंतर ग्वॉटेमॉला देशात नेले. तेथून निकारागुवा आणि हॉंडरस या देशातून मॅक्सिकोमध्ये नेण्यात आले. मॅक्सिकोजवळील टेकॉयटन सीमेवर थांबविण्यात आले. तेथे पोलिसांनी त्यांना पकडले आणि माफियांच्या ताब्यात दिले.