Breaking

Minister for Industries Uday Samant : ‘गडकरी साहेब, येवा कोकण आपलोच असा’

 

Uday Samant’s demand for ‘Advantage Konkan’ : उद्योग मंत्री उदय सामंत यांची ‘अ‍ॅडव्हांटेज कोकण’ची मागणी

Nagpur नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी विदर्भाप्रमाणे खासदार औद्योगिक महोत्सव कोकणात देखील सुरू करावा, अशी अपेक्षा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. त्यांनी अप्रत्यक्षरित्या ‘गडकरी साहेब, येवा कोकण आपलोच असा’ असंच आवाहन केलं.

खासदार औद्योगिक महोत्सवांतर्गत आयोजित ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025’चे शुक्रवारी (७ फेब्रुवारी) उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, इतर बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे यांची उपस्थिती होती.

Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, ‘एखादा प्रकल्प कमी करा पण..’

गडकरींनी आपल्या भाषणात ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ हे नाव कसं पडलं, याचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘खासदार औद्योगिक महोत्सव घेण्याचं ठरलं तेव्हा विदर्भातील आमदार-खासदारांनी माझ्याकडे कैफियत मांडली. ‘तुम्ही नागपूरचे खासदार आहात हे आम्हाला माहिती आहे, पण संपूर्ण विदर्भाचे नेते आहात. त्यामुळे आमचाही विचार करा,’ असं ते म्हणाले. त्यामुळे ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ असं नाव देऊन सर्वांना आमंत्रित केलं.’

CM Devendra Fadnavis : ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मुळे विदर्भ उद्योग क्षेत्राच्या केंद्रस्थानी

उदय सामंत यांनी गडकरींच्या भाषणाचाच धागा पडकला. ते म्हणाले, ‘गडकरी साहेब नागपूरचे खासदार आहेत, संपूर्ण विदर्भाचे नेते आहेत. पण ते महाराष्ट्र आणि देशपातळीवरील नेते आहेत. त्यामुळे त्यांनी कोकणचाही विचार करावा. कोकणात औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करावे. ‘अ‍ॅडव्हांटेज कोकण’च्या निमित्ताने कोकणातील औद्योगिक गुंतवणुकीला अधिक चालना देता येईल.’

यावेळी त्यांनी खान्‍देश, मराठवाडा अश्या ठिकाणी देखील हा उपक्रम व्हावा. महाराष्ट्र हा एकमेव असा प्रदेश आहे की, उद्योगांना कायम सरकारचा पाठिंबा मिळतो, असं उदय सामंत म्हणाले.