Students waiting for Clerk and Tax Assistant Result : एमपीएससीला उमेदवारांची आर्त साद; लिपिक व कर सहायकपदाच्या निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांची घालमेल
Akola महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) इतिहासातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेपैकी एक असलेल्या लिपिक व कर सहायक पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. परिणामी, तब्बल १५ हजार विद्यार्थी या विलंबामुळे मानसिक तणावात आहेत. त्यांची घालमेल सुरू असून, मायबाप सरकार त्यांची आर्तह हाक ऐकून घेणार का?
MPSC ने जानेवारी २०२३ मध्ये ७,४०० हून अधिक लिपिक आणि ४६८ कर सहायक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरती प्रक्रियेसाठी ३० एप्रिल २०२३ रोजी पूर्व परीक्षा झाली. तर 17 डिसेंबर 2023 रोजी मुख्य परीक्षा झाली. आणि कौशल्य चाचणी ४ ते १३ जुलै २०२४ या कालावधीत झाली. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (MAT) प्रलंबित असलेल्या खटल्यामुळे या परीक्षेचा अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
या विलंबामुळे ७,००० लिपिक आणि ४६८ कर सहायक पदांची भरती रखडली आहे, आणि त्याचा थेट परिणाम १५ हजार उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबांवर होत आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मोठ्या आर्थिक आणि मानसिक संघर्षातून अभ्यास करत स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात.
विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, जे कठीण परिस्थितीत पुण्यासारख्या खर्चिक शहरात महागडे क्लासेस लावून तयारी करतात, त्यांना या विलंबाचा मोठा फटका बसतो आहे. त्यामुळेच, वर्षानुवर्षे ठराविक विद्यार्थीच गुणवत्ता यादीत येतात, असा आरोप काही उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
नियुक्त्या लवकर व्हाव्यात यासाठी उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रभर मंत्री, आमदार, खासदार यांना निवेदने देत फिरत आहेत. MPSC ने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी आर्त साद विद्यार्थ्यांकडून घालण्यात येत आहे.