Child care support for marginalized children : १ हजार ३२० बालकांना वर्षाला २७ हजार रुपये
Wardha बालसंगोपन योजनेंतर्गत अनाथ, निराधार, बेघर, शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी १८ वर्षांपर्यंत मासिक अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील १ हजार ३२० बालकांना योजनेचा आधार मिळत आहे. त्यांना महिन्याला २२५० रुपये याप्रमाणे वर्षाला २७ हजार रुपये मिळणार आहेत.
अनाथ बालकांना शिक्षण, आरोग्य व इतर समस्यांना सामोरे जावे लागते. अशा बालकांना १८ वर्षांपर्यंत पालन, पोषण, शिक्षण प्रदान करणे या हेतूने बालसंगोपन योजना राबविली जात आहे. एका कुटुंबातील दोन बालकांना योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेमुळे त्या मुलांना दिलासा मिळत आहे.
Crime in Wardha पतीने कानशिलात लगावली; संतप्त पत्नीची चिमुकलीसह आत्महत्या
एक पालक असलेली व कौटुंबिक संकटामध्ये असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परितक्त्या, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे आदी कारणांमुळे विघटीत झालेल्या व एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरोग व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एचआयव्हीग्रस्त/बाधित बालके, तीव्र मतिमंद, एकाधिक अपंगत्व बालके, दोन्ही पालक अपंग आहेत, अशा बालकांना या योजनेचा लाभ मिळतो.
यापूर्वी बालसंगोपन योजनेतून पात्र मुलांना महिन्याकाठी ११०० रुपये दिले जात होते. काही महिन्यांपूर्वी रकमेत वाढ करण्यात आली आहे. तेव्हापासून बालकांना महिन्याला २२५० रुपये दिले जात असल्याने मुले व पालकांना दिलासा मिळत आहे.
पालकाचे, बालकाचे आधारकार्ड, मुलांच्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, पालकांचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूचा दाखला, पालकाचा रहिवासी दाखला, मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक, मृत्यूचा अहवाल (कोरोनाने जर मृत्यू झाला असेल, तर मृत्यूचा अहवाल), रेशनकार्ड झेरॉक्स, घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो, मुलांचे तीन पासपोर्ट फोटो अशी कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी लागतात.
अनाथ, दुर्धर आजारग्रस्त, दिव्यांग, एकलपालक असलेल्या बालकांच्या पाल्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, अधिक माहितीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे संपर्क साधावा. लाभ घेत असलेल्या बालकांना महिन्याला २२५० रुपये दिले जात आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी सांगितले.
Nagpur Police : २५ वर्षांच्या गुन्ह्यांची माहिती फक्त पाच मिनिटांत!
योजनेच्या लाभासाठी जिल्ह्याच्या बालकल्याण समितीकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. ज्यांचा फॉर्म भरला आहे, त्या मुलांना सोबत नेणे सक्तीचे आहे. अधिक माहितीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने केले आहे. १३०० बालकांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना लागू झाली आहे. जिल्ह्यातील अनाथ, निराधार मुलांना या योजनेंतर्गत दरमहा २२५० रुपयांचा लाभ मिळतो आहे.