Dr. Jayaraj Kopre elected unopposed as chairman : डॉ. जयराज कोपरे अविरोध; पटेल यांच्या राजीनाम्यानंतर जागा होती रिक्त
Akola अकोला आणि वाशिम या दोन जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आजोबांनंतर आता नातूही संचालक झाला आहे. डॉ. अण्णासाहेब कोरपे यांचे नातू आणि विद्यमान अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांचे चिरंजीव जयराज कोरपे हे रिक्त जागेवरील संचालक पदावर अविरोध निवडून आले आहेत.
ज्येष्ठ सहकार नेते तथा बँकेचे संचालक हिदायत पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे जयराज संतोष कोरपे यांची निवड अविरोध घोषित करण्यात आली.
डॉ. अण्णासाहेब कोरपे यांचे नातू आणि विद्यमान अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे यांचे चिरंजीव जयराज कोरपे यांची उमेदवारी आधीच निश्चित करण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे सर्व प्रक्रियेत पार पडली असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे.
सहकार गटाने निवडणूक प्रक्रियेबाबत कोणतीही माहिती बाहेर जाऊ दिली नाही, त्यामुळे सहकार क्षेत्रातील अनेकांना याबद्दल पूर्वकल्पना नव्हती. ही निवडणूक जिल्हा बँकेच्या नेतृत्वातील घराणेशाहीच्या प्रभावावर प्रकाश टाकते. काही तज्ज्ञांच्या मते, अशा निवडीमुळे सहकारी संस्थांमध्ये नवीन नेतृत्वाला संधी मिळण्याच्या शक्यता कमी होतात. जकाच कुटुंबाची मक्तेदारी कायम राहिल्यामुळे सहकारी व्यवस्थेतील लोकशाही मूल्यांवर परिणाम होतो.
यामुळे सहकार क्षेत्रातील नेतृत्व व धोरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. काही विश्लेषकांचा विश्वास आहे की, अशा निवडी स्थिरता देऊ शकतात, तर काहींना वाटते की, यामुळे नव्या विचारांना वाव मिळत नाही. भविष्यातील निर्णय प्रक्रियेवर या घडामोडीचा काय परिणाम होईल, याकडे सहकार क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.