Gadkari presented the model of 1600 Ekal Vidyalaya : आदिवासी विकास विभाग घेणार का पुढाकार ?
Nagpur Nitin Gadkari सरकारी विभागांनी स्व. लक्षमणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या एकल विद्यालयांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. गडकरी यांनी स्वतःच या कार्याची माहिती दिली. गेल्या 25 वर्षांपासून विदर्भातील आदिवासी भागांमध्ये स्व. लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट कार्य करीत आहे. ट्रस्टच्या वतीने 1600 एकल विद्यालये चालवली जात आहेत. या शाळांमध्ये 1800 शिक्षक आहेत. त्यातील 90 टक्के शिक्षक आदिवासी आहेत. कुठलेही सरकारी अनुदान न घेता हे कार्य सुरू आहे, असे गडकरी म्हणाले.
मागील काही वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशपातळीवर धडाक्याने महामार्ग निर्मितीचे काम करत आहेत. त्याचवेळी आदिवासी सक्षमीकरणासाठीदेखील प्रयत्नरत आहेत. गडकरी यांच्या मार्गदर्शनात काही स्वयंसेवी संस्थांकडून आदिवासी तरुण-तरुणींना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सुरू आहे. ही मंडळी फारशी प्रसिद्धीझोतात येत नाहीत. आदिवासी तरुणांमध्ये कौशल्यांचा विकास झाला पाहिजे हे त्यांचे स्वप्न आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा व विशेषत: आदिवासी विकास विभाग यासाठी आवश्यक गतीने पुढाकार घेणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. पोलीस मुख्यालय मैदानावर आयोजित या स्पर्धांतून चांगले खेळाडू समोर यावे असा उद्देश आहे. आदिवासी तरुणांकडे उंच झेप घेण्याची क्षमता आहे. मात्र त्यांना योग्य दिशा व कौशल्याची जोड आवश्यक आहे, असं गडकरी म्हणाले. आदिवासी समाजातील तरुण-तरुणींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करा. त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था उभी करा, असं ते अधिकाऱ्यांना म्हणाले.
MLA Randhir Sawarkar : रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर!
आदिवासी मुली एअर हॉस्टेस झाल्या पाहिजे. त्यांच्यातून पायलट, दर्जेदार शेफ घडले पाहिजे. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्या अशा सूचना गडकरी यांनी आदिवासी विकास विभागाला दिल्या. तसेच आदिवासी समाजातून संशोधक, डॉक्टर, आयएएस तयार व्हावे, यासाठी प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी आश्रमशाळांचे रेटिंग करा, असं गडकरी म्हणाले.
गडकरी पोटतिडीकीने बोलत होते. मात्र आदिवासी विकास विभाग चौकटीच्या बाहेर जाईल का? खरोखरच आवश्यक गतीने काम होणार का? की लालफितशाहीच्या कारभारात केवळ कौशल्यविकासाचा फार्स करण्यात येणार असा सवाल उपस्थित होत आहे.