Bus with full of passengers hit the divider : सात प्रवासी जखमी; चिखलीतील उदयनगर येथे अपघात
Buldhana प्रवाशांनी भरलेली एसटी महामंडळाची बस दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. ही घटना चिखली तालुक्यातील उदयनगर येथे रात्री साडेआठच्या सुमारास घडली. जखमींपैकी एक प्रवासी गंभीर असून, सर्व जखमींना उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कारंजा डेपोची शिर्डी-कारंजा बस (क्रमांक एमएच४० एन ९७९२) चिखलीवरून खामगावकडे जात होती. त्यावेळी उदयनगर येथे बसचालक शेख शकील अब्दुल शकिल यांचे बसवरील नियंत्रण सुटले. बस थेट महामार्गावरील दुभाजकावर आदळली. बसमध्ये ३० प्रवासी होते. या अपघातात बबन बारकु पवार (४८, रा. जानेफळ) गंभीर जखमी झाले आहेत, तर सहदेव बाबुराव गुंजाळ (४७, रा. शिवनी अरमाळ), रामदास नारायण जाधव (६७, रा. जानेफळ), कमलबाई शामराव पैठणे (६८, रा. डासाळा), कैलास सुखदेव हिवराळे (४५, रा. अंत्री), लता शिवशरण सारकर (६०, रा. खामगाव) आणि शिवशरण सारकर (६५, रा. खामगाव) किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर उदयनगर येथील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. अमडापूर पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार युवराज राठोड, प्रदीप चोपडे, गजानन काकडे आणि अमोल काकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. तसेच बस हटवून वाहतूक सुरळीत केली.
राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस जुन्या व निकृष्ट स्थितीत असून, प्रवाशांना धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी अशाच एका भंगार बसमुळे मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच दिवशी संध्याकाळी उदयनगर येथे बस अपघात झाला. दोन्ही अपघातांमध्ये बसच्या मंद प्रकाशामुळे वाहनचालकांना अडचण आल्याचे सांगितले जात आहे. खराब दिवे, स्टेअरिंग रॉड तुटणे, ब्रेक फेल होणे यांसारख्या तांत्रिक बिघाडांमुळे एसटी महामंडळाच्या बसेस अपघातग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.