A major disaster was averted because of Lunch Time : एशियन फायर वर्क्स कंपनीतील स्फोटाने हादरले कळमेश्वर
Nagpur दुपारच्या जेवणाची सुटी नसती तर मोठा अनर्थ झाला असता. एकाचवेळी अनेकांचा स्फोटात मृत्यू होण्याची शक्यता होती. पण, दुपारच्या त्या विशिष्ट्य वेळेने थोडक्यात निभावले. पण दोन लोकांचा मृत्यू देखील दुर्दैवीच आहे. मुळात या घटनेमुळे स्फोटकांच्या कारखान्यांमधील सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण गेल्या वर्षभरात नागपूरमध्ये स्फोटाची ही तिसरी घटना आहे.
कोतवालबड्डी गावालगत असलेल्या एशियन फायर वर्क्स Asian Fire Works दारुगोळा कंपनीच्या नियमानुसार दुपारी दोन वाजता जेवणाची सुटी होते. त्यानुसार २८ कामगार जेवणाचे डबे घेऊन कंपनीच्या बाहेर पडले. याच दरम्यान कंपनीत स्फोट झाला. त्यात कंपनीत थांबलेल्या दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले.
Nagpur Police : व्वाह रे नागपूर! हेल्मेट न घालणारे अडिच लाखांनी वाढले
कंपनीत ५० हून अधिक कामगार दारुगोळा कंपनीत कामाला आहेत. रविवार काही कामगारांची साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे १७ पुरुष आणि १६ महिला कामगार असे एकुण ३३ लोक कंपनीत काम करीत होते. दुपारी दोन वाजता जेवणाची सुटी झाली आणि २८ कामगार आपापले डबे घेऊन जेवण करायला कंपनीच्या बाहेर पडले. मात्र, ५ कामगार काम करीत होते.
‘आम्ही १० मिनिटांचे मिक्सिंग करुन येतो’ असे म्हणून ते कंपनीत थांबले. पाचपैकी तीन जण अन्य दोघांची वाट बघत होते. तेवढ्यात मोठा स्फोट झाला. यामध्ये पाचही जण गंभीर जखमी झाले. लक्ष्मण रजक आणि मुनीत मडावी या दोघांचा काही मिनिटांतच मृत्यू झाला. तर सौरभ मुसळे, साहिल दिलावर शेख आणि घनशाम लोखंडे हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
एशियन फायर वर्क्स कंपनीत स्फोट होताच मोठा आवाज झाला तसेच कंपनीला आग लागली. त्यामुळे आजुबाजुच्या गावातील अनेकांनी कंपनीच्या दिशेने धाव घेतली. काही मिनिटांतच स्फोटाची वार्ता अनेकांपर्यंत पोहचली. त्यामुळे कंपनीत गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. काही गावकऱ्यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना मदत केली. मात्र, अनेक जण बघ्याच्या भूमिकेत असल्यामुळे पोलिसांनाही कर्तव्य बजावताना अडचणीचे ठरत होते, हे विशेष.
कंपनीत जवळपास २८ कामगार दुपारी जेवायला गेले तर ७ कामगार कंपनीत काम करीत थांबले होते. त्यापैकी दोन कामगारांनी अन्य पाच कामगारांना आवाज दिला आणि स्फोट होण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वीच तेथून बाहेर पडले. दोघेही काही अंतरावर पोहचताच त्यांना स्फोट झाल्याचा आवाज आला. दोघांनीही कंपनीबाहेर न जाता स्फोट झाल्याच्या ठिकाणी धाव घेतली. त्या दोघांचेही नशिब बलवत्तर होते म्हणून ते थोडक्यात वाचले, अशी चर्चा आहे.