Manikrao Kokate’s Legislative Assembly membership should be cancelled : आमदारकी रद्द करण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी
Mumbai कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता. किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण तसे झाले नाही. आता महामहिम राज्यपाल यांनीच याप्रकरणात लक्ष घालावे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा. त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा देऊन आदर्श घालून दिला होता. पण आत्ताच्या सत्ताधारी भाजपाने नैतिकतेला हरताळ फासला आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली. महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीच्या एका बोगस प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठवली. त्यावेळी सचिवालयाने अर्ध्यारात्रीच त्यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर त्यांचे शासकीय घरही सोडण्यास भाग पाडले. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनिल केदार यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावताच त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली. पण माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत वेगळा न्याय आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय कसा, असा प्रश्न कोकाटे यांनी उपस्थित केला.
RSS विषयी म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि संघ स्वयंसेवक यांची तुलनाच होऊ शकत नाही. हा महाराजांचा आणि मावळ्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषकेला विरोध करणारा विचार हा संघाच्या विचाराशी मिळता जुळता आहे. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या शौर्याबद्दल अफवा पसरवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली.
कुंभमेळा राजकारणाचा आखाडा
कुंभमेळा हा राजकारणाचा आखाडा नाही त्यामुळे यावर राजकारण नको ही काँग्रेसची भूमिका आहे. कुंभमेळा पहिल्यांदाच होत आहे असे नाही. याआधाही कुंभमेळे झाले आहेत. पंतप्रधान व राष्ट्रपती यांनीही त्यात सहभाग घेतलेला आहे. यावेळी मात्र मोदी-योगी यांनी महाकुंभमेळ्याला राजकीय स्वरुप दिले आहे, अशी टीका त्यांनी केली








