Bus driver assaulted in Karnataka, all bus services cancelled : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
Mumbai : काल रात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो. तथापि, प्रवासी व आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात याव्या, असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय प्रभारी संचालक विवेक भीमनवार यांना मंत्री सरनाईक यांनी तशा सूचना दिल्या आहेत. परिवहन मंत्री सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांना धीर दिला. तसेच या प्रकरणात तुम्ही एकटे नसून, आपले सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे. अशी ग्वाहीदेखील दिली.
कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाशी चर्चा करत नाही, तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील. असे निर्देशदेखील त्यांनी एसटी महामंडळाला यावेळी दिले. २२ फेब्रुवारी रोजी रात्री ०९.१० वाजता मुंबई आगाराची बस बंगळुरू – मुंबई येत होती. बस क्रमांक MH14 KQ 7714) ही बस चित्रदुर्गच्या पाठीमागे दोन किलोमीटर आली असताना तथाकथित कर्नाटक संघटनेचे कार्यकर्ते यांनी गाडी थांबवून बस व चालकाला काळे फासलेॉ.
फक्त बसला काळे फासून हे समाजकंटक थांबले नाहीत तर कर्तव्यावर असलेले चालक भास्कर जाधव आणि वाहकांना मारहाण करण्यात आली. (दोघेही कोल्हापूर आगारात कार्यरत आहेत.) त्यानंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली आहे. काल (22 फेब्रुवारी) सकाळी विभाग नियंत्रक कोल्हापूर यांनी बस व चालक – वाहक यांना सुखरूप कोल्हापूर येथे आणले.
Chhagan Bhujbal : आता लासलगाव येथे थांबणार देवळाली-दानापूर शेतकरी समृध्दी किसान रेल्वे
सीमावर्ती भागातील तणाव लक्षात घेता, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. असे एसटी महामंडळकडून कळवण्यात आले आहे.