Good response to the literary conference in Delhi : नीलम गोऱ्हेंनी तसं भाष्य केलं नसतं, तर योग्य झालं असतं
Mumbai : दिल्लीत झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी होता. तर संमेलनातील इतर कार्यक्रम हे तालकोट मैदानावर झाले. साहित्य संमेलन यशस्वी झाले, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, साहित्य संमेलनाला प्रतिसाद चांगला होता. माझ्या अंदाजानं ६ ते ७ हजारांच्या आसपास लोक आले होते. साहित्य संमेलनात काही ना काही वाद होतातच. साहित्य संमेलनाचे इतर कार्यक्रम तालकटोरात झाले. वादाचे स्वरुप गंभीर नव्हते. साहित्य संमेलन यशस्वी झालंय. हे संमेलन दिल्लीत दुसऱ्यांदा होतं आहे.
पहिलं संमेलन जे झालं त्याचं नेतृत्व जवाहरलाल नेहरूंकडे होतं. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. यावेळी पंतप्रधान मोदींवर उद्घाटनाची जबाबदारी होती. स्वागताध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर होती. साहित्य संमेलनाला केंद्र सरकारमध्ये विविध पदांवर असलेल्या मराठी अधिकाऱ्यांसह देशभरातून आलेल्या मराठी भाषिकांची मोठी गर्दी होती, असे शरद पवार म्हणाले.
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नीलम गोऱ्हेंनी तसं भाष्य केलं नसतं, तर योग्य झालं असतं. संजय राऊत जे बोलले ते 100 टक्के योग्य आहे. नीलम गोऱ्हे यांनी हा वाद निर्माण करण्याची काही गरज नव्हती. नको त्या गोष्टी सांगण्याची गरज नव्हती. नीलम गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केलं. त्यानंतर त्या राष्ट्रवादीत आल्या. नंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. आता त्या शिंदेंच्या नेतृत्वात काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत चार पक्ष बदलले. त्यांनी स्वतःचा अनुभव लक्षात घेता असं भाष्य करायला नको होतं. त्या संबंधात संजय राऊत जे म्हणाले ते योग्य आहे. असे शरद पवार यांनी बोलताना सांगितले.
मी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. त्यामुळे त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. पण साहित्य संमेलनाचा वापर राजकारणासाठी होतोय, हे मात्र खरं नाही. मला मान्य नाही. यादी पाहा. ग्रंथ दिंडीत कोणीही राजकीय नव्हते. उद्घाटनात पंतप्रधान मोदी, मी आणि फडणवीस होते. दुसऱ्या सत्रात शिंदे होते. महत्त्वाचा कार्यक्रम होता.
तिसरा कार्यक्रम मराठी पाऊल पडते पुढे यात एकही राजकीय व्यक्ती नव्हते. मनमोकळा संवादात ज्ञानेश्वर उबाळे होते. राजदीप सरदेसाई होते. मंजिरी वैद्य या कार्यक्रमात होते. यातही कोणी राजकीय नव्हते. त्यानंतरच्या परिसंवादातही राजकीय लोक नव्हते. लोकसाहित्य ते भैरवी यात संवादातही राजकारणी नव्हते, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
साहित्य संमेलनाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. त्यामुळे मी म्हटलं की पडदा टाका. संजय राऊत यांना माझ्यावरही जबाबदारी टाकायची असेल तर माझी तक्रार नाही. कारण मी संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. माझी संजय राऊत यांच्याबाबत काही तक्रार नाही. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नैतिकता आणि या लोकांचा काही संबंध असेल, असे मला वाटत नाही. मी त्या गावात जाऊन आलो आहे. त्या गावातील लोकांच्या भावना मी समजू शकतो. कोणालाही स्वाभिमान असेल, अशी व्यक्ती त्या पदावर अजिबात राहणार नाही. पण संबंध राज्यातून लोकांचा हल्ला होत आहे. तरीसुद्धा सत्तेवर आपण बसून राहायचे, ही जी भूमिका घेऊन हे लोक वागत आहेत, असे शरद पवार म्हणाले.