Women staged a strike at the office of the Superintendent of Police : अल्पवयीन मुलीची छेड काढणारा माेकाटच; पोलिसांचे अभय असल्याचा आरोप
Buldhana माेताळा तालुक्यातील शेलापुर येथे पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी मागील तीन दिवसांपासून मोकाट फिरत आहे. त्याला बोराखेडी पोलिसांचे अभय मिळत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी २४ फेब्रुवारी रोजी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.
शेलापुर गावातील ४० वर्षीय व्यक्तीने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी तत्काळ बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी पोस्को कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरीही तीन दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या उलट, बोराखेडी पोलिसांनी फिर्यादीच्या नातेवाईकावरच छेडछाडीचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढून कठोर कारवाईची मागणी केली.
महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, “पोस्कोच्या गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही गावात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. कोणत्याही प्रकारचे दलाल पैसे घेऊन हस्तक्षेप करणार नाहीत, तसेच गोरगरिबांना न्याय मिळेल. पोलिसांनी त्वरीत कारवाई करून आरोपीला अटक करावी आणि महिला व मुलींना भयमुक्त करावे.”
या आंदोलनात गावातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या मागण्यांचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. स्थानिक प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.