Homeopathy doctors want to do allopathic treatment : विविध मागण्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांचा पाठपुरावा
Akola राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देणाऱ्या या डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सीसीएमपी (CCMP) कोर्स उत्तीर्ण डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी (Registration) मिळावी. २०१४ आणि २०१६ च्या कायद्यानुसार त्यांना अलोपॅथिक औषधोपचार करण्याची परवानगी द्यावी, या होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या आहेत. याशिवाय ए वर्षाचा Modern Medicine कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांना अलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची मान्यता द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
होमिओपॅथी डॉक्टरांना R.M.P. (Registered Medical Practitioner) दर्जा मिळावा. प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आणि १०८ अॅम्ब्युलन्समधील सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO) पदांसाठी होमिओपॅथी डॉक्टरांना संधी द्यावी, असंही या डॉक्टरांनी म्हटलं आहे.
बैठकीत आमदार रणधीर सावरकर यांनी “विधिमंडळात यासंबंधीचा स्पष्ट कायदा असताना, न्याय व विधी विभागाच्या मताची आवश्यकता नाही” असे स्पष्ट केले. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित सचिवांना प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना दिल्या.
भाजपा विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद रणधीर सावरकर, अकोला येथील होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण अग्रवाल, होमिओपॅथी सल्लागार समितीच्या अध्यक्ष डॉ. रजनी इंदुलकर, महाराष्ट्र होमिओपॅथ परिषदचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीमुळे सात लाख होमिओपॅथी डॉक्टर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बारा लाख कुटुंबांना न्याय मिळणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात आरोग्यसेवा बळकट होण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.