The Samriddhi Highway to Mumbai will be open by mid-March : विदर्भातील प्रवास वेगवान आणि सोयीस्कर
Amravati नागपूरहून मुंबईला आठ तासांत पोहोचण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी खुशखबर आली आहे. ७०१ किमी लांबीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आहे. मार्चच्या मध्यापर्यंत संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे सध्याच्या तुलनेत समृद्धीवरील वाहतूक दुपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने उर्वरित ७६ किमीच्या कामाची पूर्तता केली आहे. सध्या इगतपुरी (नाशिक) ते नागपूरपर्यंत ६२५ किमीचा मार्ग खुला आहे. अंतिम टप्प्यातील काही जोडणीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) करीत असून १० मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar : स्वारगेट बस स्थानकातील घटना शरमेने मान खाली घालायला लावणारी!
समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांचा मुंबईशी प्रवास अधिक वेगवान व सोयीस्कर होणार आहे. यामुळे या जिल्ह्यांतील औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. अमरावती जिल्ह्यातील शेतीमाल आणि वस्त्र उद्योगाला थेट बाजारपेठ मिळणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेती उत्पादने जलद वाहतूक होऊ शकतील. बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसाठी (लोणार सरोवर, शेगाव) अधिक प्रवासी आकर्षित होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. याशिवाय मुंबई-नागपूर प्रवासाचा वेळ १६ तासांवरून ८ तासांवर येणार आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदर नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडले जाईल.
सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा असेल. महामार्गाच्या दुतर्फा लॉजिस्टिक्स पार्क, इंडस्ट्रियल हबची निर्मिती होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी हा महामार्ग महत्त्वाचा दुवा ठरणार आहे, असाही विश्वास व्यक्त होत आहे.
Pratap Sarnaik : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा!
अपघातांचे आव्हान
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असणार आहे. महामार्ग शिर्डीपर्यंत खुला झाला तेव्हापासून मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. दररोज एक तरी अपघात या महामार्गावर होत आहे. शिवाय या अपघातांमध्ये अनेकांना जीव देखील गमवावे लागले आहेत. त्यामुळे हे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे आहे.