24 days old baby burned 65 times with a hot stickle : आईवर संशय; अमरावती जिल्ह्यात अघोरी उपचार
Amravati चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात २४ दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळईसदृश वस्तूने ६० ते ६५ चटके देण्यात आले. या अघोरी उपचारामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली आहे. त्याच्यावर अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी बाळ व्हेंटिलेटरवर आहे. हे चटके त्याच्या आईने दिल्याचा संशय आहे. याप्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेळघाटातील सिमोरी येथे २४ दिवसांच्या बाळाचे पोट फुगले होते. स्थानिक पद्धतीनुसार, या त्रासाला “डंबा” किंवा “फोपसा” म्हणतात. हा डंबा उतरवण्यासाठी गावातच अघोरी उपायांचा अवलंब करत बाळाच्या पोटावर ६० ते ६५ चटके देण्यात आले. त्यामुळे बाळाच्या त्वचेवर जागोजागी व्रण पडले. प्रकृती चिंताजनक झाल्याने २४ फेब्रुवारीला बाळाला हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
Crime in Gondia : 63 लाख रुपयांचा चुना लावून आरोपी मजा मारण्यासाठी थायलंडला!
त्यानंतर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने बाळाला अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शून्य ते एक वर्ष वयोगटातील बाळांमध्ये पोट फुगण्याचा त्रास होतो, ज्याला स्थानिक भाषेत “डंबा” किंवा “फोपसा” म्हणतात. बाळाने दूध पिल्यानंतर आईने त्याला खांद्यावर घेऊन पाठ कुरवाळली, तर त्याचा ढेकर निघतो.
ढेकर न आल्यास, बाळाचे पोट फुगते, त्यामुळे तो दूध पिण्यास नकार देतो आणि उलटी होण्याची शक्यता वाढते. योग्य वैद्यकीय उपचाराऐवजी, काही भागांमध्ये अंधश्रद्धेपोटी गरम सळईने चटके देण्याचा प्रकार केला जातो, असे डॉक्टर आदित्य पाटील यांनी सांगितले. बाळाची प्रकृती पाहता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू केली.
मात्र, कुटुंबीयांनी त्यास विरोध केला. रुग्णालय प्रशासनाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी वारंवार नकार दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी मोहपात्र यांनीही कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. चिखलदरा तालुका आरोग्य प्रशासनाने सिमोरी गावात वैद्यकीय पथक पाठवले आहे.
या घटनेची चौकशी करून बाळाला चटके देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली जाईल. असे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांनी सांगितले. सध्या गावात पोहोचलेल्या पथकाचा नेटवर्कअभावी संपर्क होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाळाला जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान त्याला TGA (Transposition of Great Arteries) हा जन्मजात हृदयविकार असल्याचे आढळले.
Accident in Nagpur : एकाच्या अंगावरून ट्रकचे चाक; दुसऱ्याला धडक
त्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने बाळाला नागपूर येथे हलवण्याची तयारी करण्यात आली आहे. तसेच, शासकीय योजनेतून त्याच्या उपचाराचा खर्च करण्यात येणार असल्याचे जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी सांगितले.