Breaking

Vidarbha Forest : छावा रात्रभर गावातच होता मुक्कामाला!

The tiger cub stayed in the village all night : गव्हात लपून बसला; गावालगत वाघिणीचाही मुक्तसंचार

Wardha सध्या देशभर छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटाची चर्चा आहे. अशात वर्धा जिल्ह्यातील एका गावात खऱ्या खुऱ्या छाव्याने रात्रभर मुक्काम ठोकला. या छाव्याने गव्हामध्ये रात्रभर आराम केला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मार्गाने निघून गेला. मात्र, त्याचवेळी वाघीणीचा मुक्त संचार गावालगत सुरू असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून वाघिणीचा गिरड शेतशिवारात मुक्तसंचार सुरू आहे. मात्र शनिवारी वाघिणीसोबत असलेले शावक भटकले. त्यामुळे वाघीण सैरभैर झाल्याने वाघिणीच्या डरकाळ्यांनी परिसरात दहशत उडाली. ही घटना गिरड परिसरात घडली. वाघिणीच्या छाव्याने गिरड येथील गव्हाच्या शेतात तब्बल सात तास मुक्काम केला. दरम्यान बघ्यांची गर्दी उसळली होती.

Crime in Wardha : रशियातील विद्यापीठात प्रवेश करून देतो म्हणून उकळले पैसे!

गिरड गावालगत शेतशिवारात वाघिणीचे शावकासह वास्तव्य असल्याची शेतकऱ्यांना खात्री होताच, सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभाग आणि पोलिस विभागाने गस्ती लावून नागरिकांची गर्दी कमी केली. दोन दिवसांपूर्वी याच शिवारात या वाघिणीने दोन पाळीव जनावरे ठार करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती. सकाळच्या वेळी शेतात जाताना शेतकरी आदित्य गौरकर आणि त्यांचा सालगडी पंकज कोहचाडे यांना रस्त्यावर वाघीण व तिचा बछडा दिसून आला. त्यांनी आपला जीव वाचवित घटनेची माहिती वनविभागाला माहिती दिली.

घटनास्थळाचा वनविभागाने आढावा घेतला असता, पदमार्ग आढळून आले. मात्र वाघिणीचा थांगपत्ता लागला नाही. दुपारी दीड वाजता हेमंत तेलरांध्ये यांच्याशी शेतात गव्हाच्या पिकाला सालगडी दिलीप गव्हाला पाणी सोडत असताना वाघिणीचा बछडा आढळून आला. दरम्यान शेतमालक हेमंत तेलरांधे यांनी वनविभागाला माहिती दिली. गावात याबाबत शेकडो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

दरम्यान वनविभाग प्रशासनाने पोलिस यंत्रणेला माहिती दिली. घटनास्थळी झालेली गर्दी पोलिसांनी नियंत्रणात आणली आणि या भागात पोलिस कर्मचाऱ्यांसह वनकर्मचाऱ्यांची गस्त लावण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक वनसेवक यांच्यासह घटनास्थळी ४ पोलिस कर्मचारी आणि ६ गृहरक्षक दलाचे कर्मचारी गस्तीवर आहेत.

Chandrashekhar Bawankule : व्याघ्र प्रकल्पाशेजारील गावांना Protection!

शेतकऱ्यांनी शेतशिवारात समूहाने जावे. शेतात आरडाओरडा करावा. वनविभागाची टीम गस्तीवर आहे. वाघिणीचे वास्तव्य आढळल्यास माहिती द्यावी. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. गावालगत असलेल्या श्रीराम मंदिराच्या शेतात वाघिणीचे शावक गव्हाच्या पिकात दिवसभर दबा धरून बसले होते.

याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाघाला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. मंगळवारी दुपारी पुन्हा कोयारी लालसिंह ठाकूर यांच्या शेताजवळ वाघिणीचे शावकाबरोबर दर्शन झाले. सुदाम किचक व त्यांची पत्नी शेतात जात असताना वाघिणीची पुन्हा डरकाळी ऐकू आल्याने दहशत कायम आहे.