Researcher claims, wheat from Punjab is causing hair loss : डॉ. बावस्कर यांच्या दाव्यामुळे नवी चर्चा, जिल्हाधिकाऱ्यांनी शक्यता फेटाळली
Buldhana जिल्ह्यातील केसगळतीचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संशोधक पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी पंजाबमधून आलेल्या रेशन गव्हामुळे केसगळती होत असल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या दाव्याला कोणताही अधिकृत पुरावा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्याला आधार काय? त्यांनी आपला संशोधन अहवाल सरकारला का दिला नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र ही शक्यता सपशेल फेटाळून लावली आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) अंतर्गत गव्हाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. या गव्हामुळे केसगळती होत असल्याच्या अफवा निराधार आहेत. गहू पुरवठा बंद करण्यात आलेला नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले.
“आतापर्यंत कोणत्याही अधिकृत संस्थेकडून गव्हामुळे केसगळती होत असल्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. ज्या भागात केसगळतीची समस्या निर्माण झाली होती, तेथे नागरिकांच्या केसांची पुन्हा वाढ होत असल्याचेही दिसून आले आहे,” असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
डॉ. बावस्कर यांनी पंजाबमधून आलेल्या गव्हामुळे केसगळती होत असल्याचा दावा केला. मात्र त्यांच्या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. जर त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील. तर त्यांनी संबंधित अहवाल जिल्हा प्रशासन, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे का सादर केला नाही? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
शिवसेना नेत्या जयश्री शेळके यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. प्रशासनाला गव्हाचा साठा जप्त करून गोदामांना सील करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने गव्हाच्या वितरणात कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : उद्धवसेनेत नाराजीसत्र; शहर प्रमुखाचा रामराम!
डॉ. बावस्कर यांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक रेशनधारक संभ्रमात पडले आहेत. गहू सेवन करावा की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. मात्र, प्रशासनाने गव्हाचा पुरवठा सुरक्षित असल्याचे सांगत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.