Public e-hearing on Mahavitaran’s electricity tariff determination on March 3 : प्रस्तावित वीज दरवाढ याबाबत वीज नियामक आयोगासमोर भूमिका मांडणार
Amravati : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्यावतीने महावितरण कंपनीच्या बहुवार्षिक वीजदर निश्चितीकरणासाठी ३ मार्च रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘नियोजन भवन’ येथे जाहीर ई-सुनावणी होणार आहे. सकाळी १०.३० वाजता ही सुनावणी सुरू होणार आहे.
महावितरण कंपनीने २०२२-२३ आणि २०२३-२४ आर्थिक वर्षांसाठी अंतिम अचूक समायोजन, २०२४-२५ साठी तात्पुरते समायोजन, तसेच २०२५-२६ ते २०२९-३० या पाचव्या नियंत्रण कालावधीसाठी वीजदर निश्चितीकरण याचिका महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहे.
महावितरण कंपनी वीज पुरवठा व वितरणासाठी आवश्यक खर्च, महसूल गरज आणि प्रस्तावित वीजदर वाढ याबाबत वीज नियामक आयोगासमोर आपली भूमिका मांडणार आहे. या निर्णयाचा ग्राहकांवर कोणता परिणाम होईल, हे या सुनावणीत स्पष्ट होणार आहे.
सार्वजनिक हित लक्षात घेता, या सुनावणीस सामान्य वीज ग्राहक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहू शकतात. इच्छुकांनी वीज नियामक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या ई-सुनावणीद्वारे महावितरणचे प्रस्तावित वीज दर, ग्राहकांची मते आणि आयोगाच्या शिफारशी यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.