Farmers angry over not receiving crop insurance claim : फक्त पत्रव्यवहारच करायचा का?; शेतकऱ्यांचा संताप
Akola अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. पीक विम्यासाठी शेतकरी वर्षभरापासून पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्यापही विम्याची रक्कम मिळाली नाही. “आम्ही फक्त पत्रव्यवहारच करत राहायचं का?” असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांनी सोमवारी लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक भूमिका घेतली.
या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी कृषी विभागाला सुनावणी घेण्याचे आदेश दिले असून, पीक विमा कंपनी, शेतकरी आणि कृषी अधिकारी समोरासमोर बसून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढणार आहेत. निसर्गाच्या लहरीमुळे शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. अशा परिस्थितीत नुकसानभरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा आधार असतो.
Harshawardhan Sapkal : काँग्रेसच्या दबावामुळे माधवी पुरी बूचविरोधात गुन्हा!
या योजनेत शेतकरी आणि केंद्र-राज्य सरकार मिळून विमा हप्ता भरतात. मात्र, खरीप हंगामात अवर्षण किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. दरम्यान, ३ मार्च रोजी पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा, भूखंड मिळावा, व्यवसायासाठी जागा मिळावी अशा विविध मागण्या लावून धरल्या.
यावर अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. दिव्यांग अर्जदारांनीही आपल्या अडचणी मांडल्या, ज्यामध्ये ४० जणांना अद्याप अर्थसहाय्य मिळाले नसल्याचे समोर आले. अकोला तालुक्यातील मोरगाव भाकरे येथील देविदास एकनाथ राठोड यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, त्यांच्या १२ एकर शेतातील पिकाचे ३० नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. त्यांनी नियमानुसार ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे तक्रार दाखल केली.
Nana Patole : मंत्रीमंडळातील मंत्र्यांची लढाई फक्त मलाईसाठी!
कंपनीने ती तक्रार स्वीकारून अनेक वेळा स्मरणपत्रे दिली, तसेच मेसेजही पाठवले. मात्र, प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळालेली नाही. विमा कंपनीकडे वारंवार चौकशी करूनही केवळ टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही सतत अर्ज करायचे, पत्र द्यायची आणि फक्त वाट पाहायची, हीच कामे करत राहायची का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.








