Gondia’s guardian minister is not paying attention to the district : पालकमंत्री नेमून उपयोग काय?; कार्यकर्त्यांचा उद्विग्न सवाल
Gondia विधानसभा निवडणुका आटोपल्या. महायुतीचे सरकार आले. मंत्रिमंडळ स्थापन झाले. पण गोंदिया जिल्ह्यावर अन्याय करण्याची परंपरा याही सरकारने कायम ठेवली आहे. महाविकास आघाडीचाच कित्ता महायुतीने गिरवला आहे. जिल्ह्यात रहांगडाले, बडोले यांच्यासारखे अनुभवी आमदार निवडून आले आहेत. पण तरीही बाहेरचा पालकमंत्री देण्याचा उद्देश काय? गोंदियातील नेत्यांना मोठं केल्याने कुणाचं नुकसान होणार आहे का? असा उद्विग्न सवाल स्थानिक कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातून विजय रहांगडाले हे भाजपचे एकमेव आमदार विजयी झाले. त्यांनी तिसऱ्यांदा बाजी मारली. त्यामुळे पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देण्याचा विचार करू शकतो, असं वाटलं होतं. दुसरीकडे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीत (NCP Ajit Pawar) जाऊन विधानसभा निवडणूक जिंकली. ते यापूर्वी सामाजिक न्याय मंत्री राहिलेले आहेत. त्यांचीही तिसरी टर्म होती. त्यामुळे त्यांना तरी पालकमंत्री करण्यात येईल, असंही अनेकांना वाटत होतं.
त्यांना मंत्रालयातील कामाचा मोठा अनुभव आहे. शिवाय गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे अजितदादांच्या कोट्यातून बडोलेंना पालकमंत्री करण्यात यावे, अशी स्थानिकांची अपेक्षा होती. पण त्याचाही उपयोग झाला नाही. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्याची उपेक्षा केल्याने राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. वारंवार जिल्ह्याला पालरमंत्रिपदापासून दुर्लक्षित ठेवल्याने कार्यकर्त्यांचाही कामाचा उत्साह कमी झाला आहे.
राज्यात ज्या पक्षाची सत्ता, असते त्या पक्षातीत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध पदांची जबाबदारी मिळत असते. विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदासह विविध समित्यांच्या माध्यमातून त्यांना महत्त्व दिले जाते. या समित्याच त्यांच्यासाठी राजकारणाची पहिली पायरी ठरतात, असं म्हटलं जातं. पण चार महिन्यांचा कालावधी लोटूनही या समित्या स्थापन करण्यासाठी पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांना वेळ मिळालेला नाही. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारपैकी तीन जागा भाजपने मिळवल्या. तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. महायुतीने शंभर टक्के यश मिळवूनही जिल्ह्याच्या पदरी निराशाच आहे, अशी खंत व्यक्त होत आहे.
शिवणकर, बडोलेंचा अपवाद
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती होऊन २५ वर्षांचा काळ लोटला. मात्र, आजपर्यंत जिल्ह्याला आयात केलेलेच पालकमंत्री मिळाले आहेत. हक्काच्या पालकमंत्र्यापासून जिल्हा वंचित राहिला आहे. भंडारा-गोंदिया संयुक्त जिल्हा असताना 1995 च्या युती सरकारमध्ये आमगावचे तत्कालीन आमदार व सिंचन मंत्री महादेवराव शिवणकर आणि 2014 च्या युती शासनात अर्जुनी मोरगावचे राजकुमार बडोले या दोनच स्थानिक नेत्यांना आतापर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भुषविता आले आहे.