Rural Development Department has sought information about ZP : ग्रामविकास विभागाने मागविली झेडपी गट-गणांची माहिती
Amravati स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. मात्र प्रशासन आपल्या पातळीवर कामाला लागले आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील गट-गणांची माहिती मागितली आहे. त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
२०११ च्या जनगणनेनंतर जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या रचनेत बदल झाला असेल. तसेच क्षेत्रनिहाय लोकसंख्येची संरचना बदलली असेल. तर अद्ययावत माहिती विहित नमुन्यात भरून पाठवावी, असे निर्देश ग्रामविकास विभागाने लेखी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका मागील पाच ते आठ वर्षांपासून रखडल्या आहेत. या काळात शहरी भागातील लोकसंख्या ग्रामीण भागात स्थलांतरित झाली असल्याची किंवा ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरी भागात स्थलांतरित झाल्याची शक्यता आहे. याशिवाय, नवीन ग्रामपंचायतींची स्थापना, त्यांच्या पुनर्रचनेचा समावेश इतर तालुक्यांत किंवा जिल्ह्यांत होणे या प्रक्रियेमुळे ग्रामीण लोकसंख्येच्या रचनेत बदल झाल्याची शक्यता आहे.
त्यामुळे गट-गणांची अद्ययावत माहिती प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ग्रामविकास विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुक उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील लोकसंख्या तसेच प्रशासनिक पुनर्रचनेबाबत सविस्तर माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशानुसार,
तालुका आणि पंचायत समितीचे नाव, एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या, गाव, वाड्या-वस्त्या तसेच अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित भागांची माहिती मागवण्यात आली आहे. २०११ नंतर ग्रामीण भागात झालेल्या बदलांचा तपशील, नव्याने अस्तित्वात आलेल्या पंचायत समित्या, तालुकानिहाय ग्रामीण लोकसंख्या, ग्रामपंचायती, वाड्या-वस्त्या, जिल्हा परिषद व निवडणुकीसाठी प्रस्तावित नगरपंचायतींची संपूर्ण माहिती पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांचा पुढाकार, अन् पॅनल तांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रश्न सुटणार!
२५ फेब्रुवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही माहिती मागविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात माहिती संकलनाची घाई सुरू झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग रचना जाहीर झाली होती. आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.