Thackeray’s ShivSena’s focusing in Amravati in Nitin Deshmukh Leadership : आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत मेळावे
Amravati नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला फारसे यश आले नाही. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर शिवसेना ठाकरे गटाने फोकस केले आहे. नवनियुक्त उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत शिवसेनेने मेळावे सुरू केले आहेत. निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून या मेळाव्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक अलीकडेच झाली. शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली. यावेळी शिवसेना उपनेते सुधीर सूर्यवंशी, माजी खासदार अनंतराव गुढे, सुनील खराटे, सुनील कडू, पराग गुढधे, महिला आघाडीच्या पदाधिकारी, अमरावती जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख उपस्थित होते.
आमदार नितीन देशमुख यांची उपनेते पदावर नियुक्ती झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील ही पहिलीच बैठक आहे. शिवसेनेचे उपनेते म्हणून आमदार नितीन देशमुख यांच्याकडे अकोला, अमरावती व बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये राहून शिवसेनेला फारसा फायदा झाला नाही. असे मत पक्षश्रेष्ठींचे झाले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा ठाकरे गट गांभीर्याने विचार करीत आहे. त्याच दृष्टिकोनातून आगामी बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांना तयारी करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. अमरावती येथे झालेल्या बैठकीमध्येसुद्धा देशमुख यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यास सांगितले. आगामी निवडणुकांसाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
अमरावती महानगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर होऊ घातलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ठाकरे गटाने या निवडणुकीवर फोकस करण्यास सुरुवात केली आहे. त्याच दृष्टिकोनातून बैठकांचे नियोजन केले जात आहे. अमरावती जिल्हा आढावा बैठक हा त्याचाच एक भाग आहे.
CM Devendra Fadnavis : अभिजात दर्जाच्या शासन निर्णयाचे काय झाले ?
अमरावती जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला सक्षम नेतृत्वाची गरज होती. देशमुख यांच्या रूपाने उपनेते म्हणून एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वात अमरावतीमध्ये शिवसेनेत नवचैतन्य निर्माण होईल, अशी आशा बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली. नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहून शिवसैनिकांमध्ये एक आदराचे स्थान मिळवलेले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात शिवसेना आगामी निवडणुकांमध्ये जादुई कामगिरी करून दाखवेल, असा विश्वासही नेत्यांनी व्यक्त केला.