Demolish the MLA Hostel of Nagpur : आमदार प्रवीण दटकेंचा मागणी, रवी भवन आणि सुयोग भवनाचाही प्रस्ताव
नागपुरातील आमदार निवास, रविभवन व सुयोग या इमारती पाडून त्याठिकाणी अत्याधुनिक सोई असलेल्या इमारती उभ्या कराव्यात, अशी मागणी भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत केली.
राज्याच्या २०२५-२६ या वर्षासाठी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या चर्चेत भाग घेताना आमदार दटके यांनी आमदार निवासच्या अपूर्ण सोयीसुविधांवर प्रकाश टाकला. दरवर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन होते. त्यासाठी सर्व मंत्रीमंडळ व विधिमंडळाचे सदस्य नागपुरात येतात. त्यांना राहण्यासाठी आमदार निवास बांधण्यात आले आहेत. मंत्र्यांसाठी रविभवन बांधण्यात आलेले आहेत. परंतु या इमारती जुन्या झाल्या आहेत. तेथे सोयीसुविधा नसल्याने अनेक आमदार तेथे राहत नाहीत.
आमदार निवासमध्ये तीन इमारती आहेत. या इमारतींना आता ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. यामुळे या इमारतींना पाडून आमदारांसाठी अत्याधुनिक सोईसुविधा असलेले नवे आमदार निवास बांधून तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली.
अनेक पदे रिक्त
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्याल, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, विशेषोपचार हॉस्पीटलमध्ये अनेक पदे रिक्त असल्याचा मुद्याही आमदार दटके यांनी मांडला. लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही पदे त्वरित भरण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे शहराच्या विस्तार लक्षात घेऊन अग्निशमन केंद्रात मनुष्यबळ अत्यंत कमी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नागपुरातील लोकसंख्या लक्षात घेता या शहरात ८०० अग्निसुरक्षा रक्षकांची आवश्यकता असताना केवळ १०० अग्नि सुरक्षा रक्षकांच्या भरवशावर काम सुरू असल्याचे आमदार दटके यांनी यावेळी सांगितले.
Ambadas Danve : राज्यपालांच्या अभिभाषणाचे अंबादास दानवेंनी केले पोस्टमार्टम !
अर्बन हाटचे अभिनंदन
नागपुरातील हलबा, कोष्टी व मुसलमान समाजातील विणकरांच्या विकासासाठी नागपुरात अर्बन हाट सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे आमदार दटके यांनी स्वागत केले. नागपुरात पारंपरिक पद्धतीने कापड तयार करण्याचा व्यवसाय होता. आता केवळ २ हजार कामठे शिल्लक राहिलेले आहेत. या समाजातील लोकांना कौशल्याचे प्रशिक्षण देऊन तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या अर्बन हाट या योजनेचे स्वागत करीत असल्याचे आमदार दटके यांनी सांगितले.