Rs 453 crores needed for Gharkul scheme, but Rs 17 crores received : ३५ हजार घरकुलांसाठी पहिला हप्ताही देणे शक्य नाही
Yavatmal यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून बेघरांना घरकूल बांधून दिले जात आहे. जिल्ह्यातील ३५ हजार घरकुलांना योजनेतून मंजुरी मिळाली आहे. या घरकुलाच्या पूर्ततेसाठी ४५३ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. पण १७ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याकडे वळता करून सरकारने चांगलीच थट्टा केली आहे. कारण यातून पहिल्या हप्त्याचा निधीही लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यासाठी किमान ५५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
५५ कोटी रुपयांचा निधी पहिल्या हप्त्यासाठी आलाच नाही. स्वतःचे घर नसलेल्या व्हिजेएनटी VJNT लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल मिळावे. म्हणून राज्य शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकूल मंजूर केले आहे. घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना एक लाख २० हजार रुपयांचा निधी दिला जातो. चार टप्प्यांत हा निधी लाभार्थ्यांना मंजूर केला जातो.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. आता प्रत्यक्षात लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे काय, याची शहानिशा करण्याच्या सूचना आहे. त्यानुसार फेर तपासणी करून लाभार्थी निवडीची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
जिल्ह्यात घरकुलासाठी अर्ज सादर केलेल्या आणि घरकूल मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांकडे स्वतःच्या मालकीची जागाच नाही. यामुळे अशा लाभार्थ्यांचे घरकूल बांधायचे कुठे, असा प्रश्न या लाभार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये ३५ हजार लाभार्थ्यांना १५ हजारांचा पहिला हप्ता दिला जातो. त्यानुसार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्याला १७ कोटी रुपयांचाच निधी मिळाला. यात पहिला हप्ता वितरीत करण्याचे काम प्रभावित झाले आहे.
घरकूल बांधण्यासाठी लागणाऱ्या विटा, गिट्टी, मुरूम, रेती, गज या सर्वच कच्च्या मालांच्या वस्तूचे दर वाढले आहेत. या वाढलेल्या दरात मंजूर झालेल्या अपुऱ्या निधीतून घर बांधायचे कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.