BJP is the only national party that runs on democracy: भाजपच्या संघटनपर्वाला सुरुवात; मंत्री बावनकुळेंची उपस्थिती
Nagpur देशात २३०० हून अधिक पक्ष आहेत. मात्र भाजप व भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोडले तर इतर सर्व कुठल्या तरी कुटुंबाचे पक्ष आहेत. कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर भाजपच लोकशाहीवर चालणारा पक्ष उरला आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपुरात भाजपच्या संघटनपर्वाला सुरुवात झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान रविवारी (दि. 5 जानेवारी) ते बोलत होते.
रेशीमबाग येथील महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, शहराध्यक्ष बंटी कुकडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, संजय भेंडे, अश्विनी जिचकार प्रमुख्याने उपस्थित होते.
राज्यात निवडणूक जिंकल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे काम संपलेले नाही. उलट पक्ष व कार्यकर्त्यांवरील जबाबदारी वाढली आहे. आता कार्यकर्त्यांनी लोकाभिमुख होऊन काम करावे. जनता-सरकारमधील सेतू बनावे. सोबतच पक्ष विस्तारावर भर द्यावा. भाजपचे राज्यातील दीड कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Shikshak Bank : शिक्षक बँक पदभरती घोटाळा; चौकशीत राजकीय हस्तक्षेप !
२०१४ साली अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाले होते. तेव्हा त्यांनी पक्षाला जगातील सर्वात मोठा पक्ष बनविण्याचे टार्गेट ठेवले होते. चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे ८ कोटी सदस्य होते. आपण ११ कोटी सदस्य केले व भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला. मात्र येथे थांबायचे नाही. एकट्या महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य करण्यात येईल, असा दावा प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय कार्यकारिणीसमोर केला आहे. डिजिटल नोंदणीमुळे हे काम अधिक सोपे झाले आहे, असंही ते म्हणाले.
डिजिटल नोंदणीमुळे कार्यकर्त्यांचा Contact Number पक्षाकडे नोंदवला जातो. त्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहचवणे शक्य होते. त्यादृष्टीने सर्वांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते बुथपातळीवर उत्तमप्रकारे नोंदणी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांच्या रेफरल कोडचा वापर करत २५ जणांना भाजपचे सदस्य केले.