BJP is deteriorating communal harmony in Maharashtra : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका; सिंधुदुर्ग येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा
Sindhudurg देवेंद्र फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात एक एक मंत्री एक एक नमुना आहे. अशा मंत्र्यांमुळे राज्यातील सद्भाव, विवेक, महाराष्ट्र धर्म नष्ट होत आहे. भाजपा सरकारच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सिंधुदुर्ग येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता या मुळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे, असंही सपकाळ म्हणाले.
Harshawardhan Sapkal : धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?
कोकणाला निसर्ग सौंदर्य व संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. कोकणच्या या भूमीत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वी. स. खांडेकरांचा जन्म झाला. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते असा प्रेमाचा संदेश देणारे मंगेश पाडगावकर यांचा हा जिल्हा. मधू दंडवते, नाथ पै यांच्यासारख्या महान नेत्यांचा हा जिल्हा आहे. एकापेक्षा एक सरस खासदार या जिल्ह्यातून झाले. ज्यांनी सभ्यता, संस्कृती व लोकशाही मुल्ये कशी असतात याचा आदर्श घालून दिला आहे. आज त्याच जिल्ह्यातील काही लोकांच्या तोंडातून दररोज गटारगंगा वाहत आहे. एक मंत्री हम करे सो कायदा म्हणतो, दुसरा आमदार सैराट आहे. आमच्या पक्षात नाही तर निधीच देणार नाही अशी धमकी दिली जाते, हा सर्व प्रकार महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
Harshwardhan Sapkal : आजपर्यंत महिला सरसंघचालक का झाल्या नाहीत?
राणेंनी काँग्रेस सोडल्याने फरक पडला नाही
नारायण राणे हे दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले. ते १२ वर्ष काँग्रेसमध्ये राहिले. त्यातील ९ वर्षे ते सत्तेत राहिले. त्यांचा परभाव झाल्यानंतर विधान परिषदेवर त्यांना निवडून दिले. पण नंतर ते कडगोळे घेऊन दुसऱ्या पक्षात गेले. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते व सत्ता होती म्हणून ते आले होते. सत्ता नाही हे दिसताच ते परत गेले. ते जरी गेले असले तरी या जिल्ह्यात काँग्रेसचा कार्यकर्ता व काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, असे सपकाळ म्हणाले.








