Threat to farmers in Jigaon project : प्रशांत डिक्कर यांची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ऑफर, नकार दिल्यावर जीवे मारण्याची धमकी
Khamgao जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणारे स्वराज्य पक्षाचे नेते प्रशांत डिक्कर यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर शेतकऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिगाव प्रकल्पातून प्रति एकर ४० लाख रुपयांचा मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन देत डिक्कर यांनी एकरी पाच लाख रुपये मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
२१ मार्च रोजी प्रशांत डिक्कर हे जिगाव प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यासाठी शेगावला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हिंगणा कवठळ येथील शेतकरी त्यांना भेटले. त्यावेळी डिक्कर यांनी प्रति एकरी ४० लाख रुपयांचा मोबदला मिळवून देण्याच्या मोबदल्यात एकरी ५ लाख रुपये मागितल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
Sudhir Mungantiwar : आणीबाणीत कारावास भोगणाऱ्यांचा सन्मान निधी वाढवा!
शेतकऱ्यांनी ही मागणी फेटाळली असता, “जर पैसे दिले नाहीत, तर तुमच्या विरोधात आंदोलन करून तुम्हाला मिळणारा मोबदला रोखू,” अशी धमकी डिक्कर यांनी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आठ दिवसांपूर्वी काही शेतकऱ्यांनी ५ लाख रुपये दिले होते. परंतु ते पैसे परत मागितले असता डिक्कर यांनी नकार दिला आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ येथील शेतकरी पुष्पा संदीप मोरखडे यांनी तक्रार दिली होती. त्यावरून शेगाव पोलिसांनी प्रशांत डिक्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रशांत डिक्कर यांना अटक करण्यात आली आहे.
प्रशांत डिक्कर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, आता त्यांच्यावरच खंडणी उकळल्याचा आरोप झाल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Jayant Patil : आपण सभागृहाची ऐसीतैसी करायला लागलो, शांत जयंत पाटील चिडले !
प्रशांत डिक्कर यांच्या या प्रकारामुळे शेतकरी चांगलेच संतापले आहेत. एकीकडे सरकारकडून प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळत नाही. दुसरीकडे राजकीय पुढारी अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता कुणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.








